इंग्रजीमध्ये एक वाक्प्रचार आहे You are what you eat म्हणजे आपण जे खातो त्याप्रमाणे आपली भावना बनते. आहार ही आपल्या दैनंदिन जीवनातील एक महत्त्वाची क्रिया आहे, पण त्याचा आपल्या जीवनावर विशेषतः आपल्या विचारावर, भावनेवर किती परिणाम होत असतो याची बहुतेकांना कल्पनाच नाही. काही जण तर आक्षेप घेतात की आम्ही काय खावे हे तुम्ही आम्हाला कोण सांगणारे? आमच्या मनाला येईल ते, वाटेल त्या वेळेला आम्ही खाऊ.! अशा स्वैराचारी वृत्तीने वागल्यानेच आपल्याला नको त्या आजारांना विनाकारण सामोरे जावे लागते. म्हणून मनाप्रमाणे जर आपल्या जिभेवर नियंत्रण असल्यास आपले जीवन आनंदी आणि निरोगी बनण्यास मदत होईल एवढेच नव्हे तर मनुष्य जीवनाचे अंतिम ध्येयही सहजतेने प्राप्त करता येईल.
भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात प्रत्येक व्यक्तीला आवडणारा आहार हा त्याच्या प्रकृतीच्या तीन गुणांनुसार असतो. आयुःसत्त्वबलारोग्यसुखप्रीतिविवर्धनाः । रस्याः सि्?नग्धाः स्थिरा हृद्या आहाराः सात्त्विकप्रियाः । अर्थात ‘सत्त्वगुणी मनुष्यांना प्रिय असणारा आहार, त्यांचे आयुष्य वृद्धिंगत करतो, जीवनशुद्धी करतो आणि बल, आरोग्य, सुख आणि संतोष प्रदान करतो. असा आहार, रसयुक्त स्निग्ध, पौष्टिक आणि हृदयाला संतुष्ट करणारा असतो. (भ गी 17.8) कट्?वम्ललवणात्युष्णतीकृष्णरूक्षविदाहिनः । आहारा राजसस्येष्टा दुःखशोकामयप्रदाः। अर्थात ‘रजोगुणी मनुष्यांना, अत्यंत कडू, आंबट, खारट, गरम, तिखट, शुष्क आणि दाहकारक आहार प्रिय असतो. असा आहार दुःख, शोक आणि व्याधी निर्माण होण्यास कारणीभूत असतो. (भ गी 17.9) यातयामं गतरसं पूति पर्युषितंच यत्। उच्छिष्टमपि चामेध्यं भोजनं तामसप्रियम् । अर्थात ‘तीन तासांपेक्षा अधिक काळापूर्वी शिजवलेले, बेचव, नासलेले, दुर्गंधीयुक्त, उष्टे आणि अपवित्र पदार्थानी युक्त असे अन्न तमोगुणी लोकांना प्रिय असते.’ (भगी 17.10). या तिन्ही श्लोकांचे तात्पर्य हे आहे की मनुष्याने कमीत कमी सात्त्विक आहाराचे सेवन करावे कारण आयुष्यवृद्धी करणे, मनःशुद्धी करणे आणि बलवृद्धी करणे हाच एकमेव अन्नसेवनाचा उद्देश आहे. त्याही पुढे जाऊन असे सात्त्विक अन्न भगवान श्रीकृष्णांना नैवैद्य म्हणून अर्पण करून मग ते प्रसादरूपाने सेवन केल्यास असे अन्न पवित्र होते आणि आपली भावना पूर्ण विकसित अर्थात मूळ कृष्णभावना जागृत होते. यासाठीच पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर, उडुपी येथील श्रीकृष्ण मंदिर, तिरुपती येथील बालाजी मंदिर इत्यादी वैष्णव मंदिरातून अशा प्रसादाचे वितरण केले जाते. हे प्रसाद सेवन केवळ मंदिरापुरतेच मर्यादित नसून आपले घरही भगवंताचे मंदिर बनावे आणि असा प्रसाद दररोज सेवन करावा हा त्यामागील उद्देश आहे.
प्रसाद सेवन हे आध्यात्मिक विज्ञान आहे हे समजून सांगताना संत तुकाराम महाराज एका सुंदर अभंगात म्हणतात पवित्र ते अन्न । हरिचिंतनीं भोजन ।। 1 ।। येर वेढय़ा पोटभरी । चोम मसकाचे परी ।।2।। जेवूनिया तोचि घाला । हरिचिंतनीं केला काला ।। 3 ।। तुका म्हणे चवी आले । जे कां मिश्रित विठ्ठले ।। 4 ।। अर्थात ‘भगवान श्रीकृष्णाचे चिंतन करून भोजन केल्याने ते अन्न पवित्र होते. याशिवाय नुसतेच अन्न खाल्ल्याने कातडय़ाची पिशवी भरल्याप्रमाणे होते. जे हरिनाम स्मरण करून प्रसाद सेवन करतात ते भगवद्कृपेने तृप्त होतात. तुकाराम महाराज म्हणतात, जे विठ्ठल नामाच्या मिश्रणाने तयार झाले आहे, त्याला फार चांगली गोडी प्राप्त होते.’
या अभंगात आपल्या मनुष्य जीवनाचे सार्थक करण्यासाठी आणि आध्यात्मिक उन्नती करण्यासाठी तुकाराम महाराज आपल्याला गीता-भागवतच्या आधारे कशा प्रकारे अन्न सेवन करावे याबद्दल मार्गदर्शन करीत आहेत. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण आपल्याला जीवनातील सर्व कार्ये शुद्ध करण्यास सांगतात, कारण प्रत्येक कार्य हे भगवंताच्या प्रसन्नतेसाठी करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे, यालाच यज्ञ असे म्हटले आहे. असे कार्य केल्याने आपण कर्मबंधनापासून मुक्त होतो.
यज्ञार्थात्कर्मणो।़न्यत्र लोको।़यं कर्मबन्धनः । तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसङ्गः समाचर । अर्थात ‘श्रीविष्णुप्रीत्यर्थ यज्ञ म्हणून कर्म केले पाहिजे नाही तर कर्म हे या भौतिक जगामध्ये बंधनास कारणीभूत ठरते. म्हणून हे कौंतेय ! तू आपल्या नियत कर्माचे पालन श्रीविष्णूच्या संतोषार्थ कर आणि या प्रकारे तू नेहमी कर्मबंधनातून मुक्त राहशील.’ (भ गी 4.9) जीवनामध्ये कुठलेही कार्य आपल्याला भगवंतावर अवलंबून राहूनच करावे लागते, याची जाणीव ठेवणे आवश्यक आहे. जगण्यासाठी आवश्यक असणाऱया सर्व वस्तूंचा पुरवठा देवतांच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्णच आपल्याला पुरवीत आहेत. यासाठी कृतज्ञतेच्या भावनेतून त्या वस्तूंचा स्वीकार करून त्याचा भगवंताच्या सेवेसाठी उपयोग करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.
सर्वप्रथम हे जाणणे आवश्यक आहे की, ज्या वस्तूंशिवाय कोणताही जीव जगू शकत नाही ते हवा, पाणी आणि अन्न हे भगवान श्रीकृष्णांनी सर्व जीवांसाठी निर्माण केले आहे. या कारणास्तव त्यांना भगवंतांना कृतज्ञतापूर्वक अर्पण करणे महत्त्वाचे आहे. जर आपण भगवंतांना अन्न अर्पण केले नाही तर आपण अन्न सेवन करीत नसून पापाचे सेवन करीत आहोत. यज्ञशिष्टाशिनः सन्तो मुच्यन्तो सर्वकिल्बिषै । भुञ्जते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात् अर्थात ‘भगवद्भक्त हे सर्व प्रकारच्या पापांतून मुक्त होतात, कारण ते सर्वप्रथम यज्ञाला (श्रीविष्णूला) अर्पण केलेले अन्न ग्रहण करतात. इतर लोक जे आपल्या स्वतःच्या इंद्रियतृप्तीकरिता भोजन बनवितात ते खरोखरच केवळ पापच भक्षण करतात. (भ गी 3.13) हे जाणून घेऊन प्रत्येकाने भगवान श्रीकृष्णांना नैवेद्य अर्पण करून प्रसाद सेवन करणे किती महत्त्वाचे आहे हे समजून घेतले पाहिजे.
आहार आपल्या जीवनात कसा परिणाम करतो हे सांगण्यासाठी शास्त्रामध्ये वर्णन आहे की आहारशुद्धीः सत्वशुद्धीः ध्रुव स्मृतीः । स्मृतिर्लबध्ये सर्वग्रंथीनां विप्रमोक्षाः ।। अर्थात ‘भगवंतांना अन्न अर्पण केल्याने मनुष्याचा आहार शुद्ध होतो आणि शुद्ध आहार ग्रहण केल्याने त्याचे जीवन शुद्ध बनते. जीवन शुद्धीमुळे स्मृतीमधील अतिसूक्ष्म पेशींचे शुद्धीकरण होते आणि जेव्हा स्मृती शुद्ध होते तेव्हा मनुष्य मोक्षमार्गाचा विचार करू शकतो आणि या सर्वांची परिणती कृष्णभावना विकसित होण्यामध्ये होते. दुसऱया शब्दात सांगावयाचे तर जसे अन्न आपण सेवन करतो त्याप्रमाणे आपले विचार बनतात, जसे आपले विचार असतात तसे आपले आचरण बनते, जसे आपले आचरण असते तसा आपण इतरांशी व्यवहार करतो. म्हणून श्रीकृष्णप्रसाद सेवन करणे महत्त्वाचे आहे.
भगवान श्रीकृष्ण कोणत्या स्वरूपात आणि कशा भावनेत आपण अर्पण केलेले अन्न स्वीकारतात याचे मार्गदर्शन करताना सांगतात पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्य?ा प्रयच्छति ।तदहं भक्त्य? पहृतमश्न?ामि प्रयतात्मनः। अर्थात ‘जर एखाद्याने प्रेमाने आणि भक्तीने मला एखादे पान, फुल, फळ अथवा पाणी अर्पण केले तर मी त्याचा स्वीकार करतो.’ (भ गी 9.26) या श्लोकामध्ये ‘भक्ती’ हा शब्द दोनदा आला आहे. श्रद्धापूर्वक प्रेमाने जर आपण पत्र, पुष्प, फळ अथवा पाणी अर्थात कांदा लसूणविरहित सात्त्विक शाकाहारी पदार्थ जर भगवान श्रीकृष्णांना नैवैद्य रूपात अर्पण केले तर भगवंत त्याचा स्वीकार करतात. जेव्हा आपण भगवंतांना अर्पण केलेले उच्छिष्ट सेवन करतो ‘जे का मिश्रित विठ्ठले’ तेव्हा आपली भावना पूर्णपणे बदलून जाते अर्थात विठ्ठलमयी होते. ज्यांना या जगातील सर्व दुःखातून मुक्त व्हावयाचे आहे त्यांनी ‘पवित्र ते अन्न । हरिचिंतनीं भोजन ।।’ असा सात्त्विक शुद्ध आहार प्रसादरूपाने सेवन करावा आणि आपले विचार, आचार आणि व्यवहार शुद्ध ठेवावा जेणेकरून आपल्याला नित्य हरिचिंतन घडावे. अन्यथा ‘येर वेढय़ा पोटभरी । चोम मसकाचे परी’ नुसतेच अन्न खाल्ल्याने केवळ कातडय़ाची पिशवी भरल्याप्रमाणे होते.
-वृंदावनदास








