जुगाऱ्यांसाठी जणू काही ‘पॅकेज’ची योजना : कोट्यावधीच्या व्यवहारांमुळे अड्डेचालक एकमेकांच्या जीवावर, पोलिसांच्या बघ्याच्या भूमिकेमुळे जनतेत संताप
बेळगाव : बेळगाव शहर व तालुक्यातील काही गावात मटका, जुगार वाढला आहे. याबरोबरच अमलीपदार्थांचे सेवन व विक्रीही वाढत चालली आहे. गैरधंदे थोपविण्याची जबाबदारी असणारी पोलीस यंत्रणा मात्र निवांत असून जणू या प्रकारांशी आपला काहीएक संबंध नाही, अशा भूमिकेत पोलीस अधिकारी वावरत आहेत. जुगारी अड्डेचालकांमधील स्पर्धा जीवघेणी ठरत असून एकमेकांना संपविण्यासाठी हल्ले करण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. गुरुवारी मध्यरात्री घडलेल्या गोळीबारानंतर बेळगाव परिसरात सुरू असलेले गैरधंदे, या माध्यमातून होणारी कोट्यावधी रुपयांची आर्थिक उलाढाल, पोलीस अधिकारी व गैरधंदेचालक यांच्यातील साटेलोटे, व्यवसाय वृद्धीसाठी जुगारी अड्डेचालकांमध्ये सुरू झालेली स्पर्धा, याच स्पर्धेतून निर्माण झालेल्या वितुष्टामुळे एकमेकांना संपविण्यासाठी एकमेकांवर होत असलेले हल्ले आदी लक्षात घेता जुगारी अड्डेचालक पोलीस यंत्रणेपेक्षाही किती मोठे झाले आहेत, हे दिसून येते. एखाद्या शहरात पोलीस अधिकाऱ्यांपेक्षा गुन्हेगार सर्वार्थाने मोठे झाले तर तशा शहरातील गुन्हेगारी कारवाया नियंत्रणात येत नाहीत. कारण, पोलीस यंत्रणा मिंधी झाली असल्यामुळे मटका, जुगारी अड्डेचालक चांगलेच माजतात.
सध्या बेळगावात अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग व उपायुक्त रोहन जगदीश आदी अधिकारी आपण गैरधंदे खपवून घेणार नाही, असे वारंवार सांगत आले असले तरी सध्या उदंड झालेले अड्डे लक्षात घेता पोलिसांचे काहीच चालेना की काय? असा संशय बळावत चालला आहे. सहा महिन्यांपूर्वी एका जुगारी अड्डेचालकावर चाकूहल्ला झाला होता. या घटनेनंतर आता गोळीबाराची घटना घडली आहे. बेळगाव परिसरात मोठ्या प्रमाणात लहान-मोठे जुगारी अड्डे सुरू आहेत. मोठ्या अड्ड्यांवर तास व दिवसाच्या हिशोबावर व्याजाने पैसे देण्याचीही व्यवस्था आहे. जुगार खेळण्यासाठी जाणाऱ्यांचे जेवणखाण व त्यांची ने-आण करण्याची जबाबदारीही जुगारी अड्डेचालक उचलतात. बहुतेक अड्ड्यांची माहिती पोलीस दलाला आहे. तरीही या अड्ड्यांवर कारवाई केली जात नाही. अनेक जुगारी अड्डेचालकांवर काही पोलीस अधिकाऱ्यांची चांगलीच मर्जी आहे. त्यामुळे हे अधिकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल करताना दिसत आहेत. बॉक्साईट रोड, कंग्राळी खुर्द, बेनकनहळ्ळी, हलगा-बस्तवाड, यरमाळ रोडबरोबरच चंदगड व बेळगावच्या सीमेवर अनेक अड्डे सुरू झाले आहेत. बाची, तुरमुरी परिसरात जुगाऱ्यांची नेहमी वर्दळ असते. वडगाव परिसरातही मोठ्या प्रमाणात जुगार सुरू आहे.
शहरात सुरू असलेल्या बहुतेक अड्ड्यांची माहिती पोलीस दलाला आहे. अड्डेचालकांमध्ये सुरू असलेली स्पर्धा, कलेक्शन वाढविण्यासाठी एकमेकांना संपविण्यासाठी सुरू असलेल्या कारवायांची माहितीही पोलीस दलाला आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हेगारी कारवाया थोपविण्याऐवजी अड्डेचालकांना आशीर्वाद देण्याचे काम काही पोलीस अधिकारी करत असून त्यामुळेच जुगारी अड्डेचालकांमध्ये आता जीवघेणा संघर्ष सुरू झाला आहे. एखादा अधिकारी कारवाईसाठी या अड्ड्यांवर पोहोचला तर अड्डेचालक थेट आपल्या गॉडफादरचे नाव सांगत फोन लावून देऊ का? अशी विचारणा करतात. काही ठिकाणी रिक्रिएशन क्लबची परवानगी घेऊन अंदरबाहर जुगार सुरू आहे. या अड्ड्यांवर रोजची उलाढाल कोट्यावधीच्या घरात आहे. त्याबरोबरच मटका व्यवसायही उघडपणे सुरू आहे. केवळ दिखाव्यासाठी महिन्यातून एक-दोन कारवाई करून मोठ्या अड्डेचालकांना मोकळीक सोडण्यात आली आहे.
सहा महिन्यांपासून जुगारी अड्डेचालकांमध्ये संघर्ष
गेल्या सहा महिन्यांपासून जुगारी अड्डेचालकांमध्ये संघर्ष सुरू आहे. कोणाच्या अड्ड्यावर उलाढाल किती? जुगाऱ्यांची संख्या किती? यावरून हा संघर्ष आहे. एकमेकांचे गिऱ्हाईक पळविण्याचे कामही उघडपणे सुरू आहे. तरीही पोलीस दलाच्यावतीने या अड्डेचालकांवर कारवाई करण्याची तसदी घेतली गेली नाही. त्यामुळे पोलीस यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात अडकली असून वाढत्या गुन्हेगारीला ही यंत्रणाच जबाबदार असल्याचे दिसून येत आहे.
आताच्या अधिकाऱ्यांना का शक्य नाही?
23 ऑगस्ट 2018 रोजी तत्कालीन पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांनी कुद्रेमनीजवळील शेतवडीत सुरू असलेल्या जुगारी अड्ड्यावर छापा टाकून 40 जुगाऱ्यांना अटक केली होती. या कारवाईत 44 दुचाकी, 30 मोबाईल जप्त करण्यात आले होते. त्यानंतर बेळगाव पोलिसांकडून एकही मोठी कारवाई झाली नाही. जे सीमा लाटकर यांना शक्य झाले, ते आताच्या अधिकाऱ्यांना का शक्य होत नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हवालदारच ताबेदार?
बेकायदा दारुविक्री, मटका, जुगारी अड्डेचालकांबरोबर काही पोलीस अधिकारी व पोलिसांची ऊठबस आहे. हे अड्डेचालक एकमेकांवर हल्ले करत असले तरी एक पोलीस हवालदार या सगळ्यांनाच खेळवतो. सर्व अड्डेचालकांना हवा असणारा हवालदार शंकर कोण? याचा शोध घ्यावा लागणार आहे. वरिष्ठ अधिकारी व अड्डेचालक यांच्यात दिलजमाई करून हा हवालदार तालुक्यातील अड्ड्यांवर फिरत असतो. जसे अड्डेचालकांना तो प्रिय आहे, काही पोलीस अधिकाऱ्यांनाही तो तितकाच प्रिय आहे. कणबर्गी रोडवरील एका लॉनजवळ व आरटीओ सर्कलजवळ उभे राहून त्याचे व्यवहार सुरू असतात.
पोलीस आयुक्तांचे आश्वासन हवेत!
सहा महिन्यांपूर्वी झालेल्या हल्ला प्रकरणानंतर 24 जून 2024 रोजी ‘तरुण भारत’ने ‘गुन्हेगारांभोवती सुरक्षाकडे, उदंड झाले जुगारी अड्डे’ या मथळ्याखाली बेळगाव शहर व उपनगरात सुरू असलेले मटका व जुगारी अड्ड्यांविषयी माहिती दिली होती. त्याचवेळी पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनी या अड्ड्यांवर कारवाई करण्याची ग्वाही दिली होती. मात्र, मटका-जुगारी अड्ड्यांवर ठोस कारवाई झाली नाही. उलट पोलिसांनी बोली वाढवून त्यांना खुली सूट दिली. याच बातमीत पुन्हा एकदा टोळीयुद्धाचा धोका निर्माण झाल्याची भीतीही व्यक्त करण्यात आली होती. आता ती खरी झाली आहे. जुगारी अड्डेचालक एकमेकांना संपविण्यासाठी मैदानात उतरले आहेत. आता या परिस्थितीतून बेळगावला वाचविण्यासाठी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनीच भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांचे कान पिळावेत, अशी मागणी केली जात आहे.









