वृत्तसंस्था/ चेन्नई
फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीने आपल्या प्लॅटफॉर्म शुल्कामध्ये नुकतीच दोन रुपयांची वाढ केली आहे. उत्सवी काळाच्या पार्श्वभूमीवर फूड डिलिव्हरी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या स्विगीने आपले प्लॅटफॉर्म शुल्क आता 14 रुपये केलेले आहे. यापूर्वी कंपनीचे हेच शुल्क 12 रुपये इतके होते.
ग्राहकांची प्रत्येक ऑर्डर नफ्यामध्ये परिवर्तित करण्यासाठी कंपनीने शुल्क वाढवले असल्याचे समजते. एप्रिल 2023 मध्ये सर्वात आधी स्विगीने प्लॅटफॉर्म शुल्क आकारायला सुरुवात केली होती. हळूहळू कंपनीने आपल्या प्लॅटफॉर्म शुल्कात टप्याटप्याने वाढ केली आहे. असं जरी असलं तरी कंपनीच्या ऑर्डर संख्येवर कोणताही परिणाम झालेला नाही. प्रति ऑर्डरवर दोन रुपयांची वाढ ही ग्राहकांसाठी फारशी चिंतेची नसणार असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.
दररोज 20 लाख ऑर्डर्स
सध्याला पाहता दर दिवशी स्विगी 20 लाख ग्राहकांना खाद्य पदार्थांची डिलिव्हरी करते. सध्या वाढवण्यात आलेल्या दोन रुपयांच्या शुल्क वाढीमुळे कंपनीच्या खात्यामध्ये प्रति दिवसाला 2.8 कोटी रुपये जमा होतील तर वर्षाला 33.6 कोटी रुपये अतिरिक्त उत्पन्न मिळणार आहे. उत्सवीकाळामध्ये कदाचित कंपनी प्लॅटफॉर्म शुल्क पुन्हा कमी करून 12 रुपयेही करू शकते, असे म्हटले जात आहे.









