जिल्हाधिकारी कार्यालय नूतनीकरण कामाचा फटका : त्वरित सर्व्हर समस्या दूर करण्याची मागणी
बेळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आल्याने जुन्या इमारतीत लोंबकळणाऱ्या केबल तोडण्यात आल्या आहेत. यामध्ये सर्व्हरची केबलदेखील तोडण्यात आली असल्याने अन्न व नागरी पुरवठा खात्याचे सर्व्हर गायब झाले आहे. त्यामुळे याचा फटका रेशनकार्डधारकांना गेल्या तीन दिवसांपासून बसला आहे. तातडीने सर्व्हर समस्या दूर करावी, अशी मागणी केली जात आहे. ब्रिटिशकालीन इमारतीत जिल्हाधिकारी कार्यालय असून सदर इमारत जीर्ण झाली आहे. त्यामुळे एकाच छताखाली सर्व शासकीय कार्यालये सुरू करण्याच्या उद्देशाने नूतन भव्य जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत बांधण्यासाठी प्रयत्न सुरू होते. त्यातच सध्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीचे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
नवीन इमारत बांधण्याचा प्रस्ताव बारगळला का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दर्शनी भागाच्या भिंतीवर दगडी फरशा बसविल्या जात आहेत. त्याचबरोबर उपनोंदणी कार्यालयाच्या समोरील जिल्हाधिकारी कार्यालय आवारात लोंबकळणाऱ्या केबल हटवून त्या नवीन घालण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सदर काम सुरू असताना मुख्य सर्व्हरची केबलदेखील तोडण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात असलेल्या शहर व ग्रामीण भागाच्या अन्न व नागरी पुरवठा खात्याचे सर्व्हर गायब झाले आहे. रेशनकार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव दाखल करण्यासाठी व इतर कामासाठी येणाऱ्या नागरिकांना सर्व्हर नसल्याचे सांगून माघारी धाडले जात आहेत. गेल्या तीन दिवसांपासून सर्व्हर नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.
लवकर समस्या सोडवू
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे मुख्य सर्व्हरची केबल तोडण्यात आली असावी, त्यामुळेच सर्व्हरची समस्या निर्माण झाल्याची शक्यता आहे. लवकरच सर्व्हर समस्या सोडविण्याची सूचना केली जाईल.
– मल्लिकार्जुन नाईक, उपसंचालक अन्न व नागरी पुरवठा खाते









