बेळगाव : अन्न व नागरी पुरवठा खात्याने रेशन दुकानदारांना थर्मल प्रिंटर बसविण्याचा आदेश दिला आहे. मात्र आमच्याकडे प्रिंटर खरेदी करण्यासाठी व्यवस्था नसल्याने सदर खात्याने आम्हाला प्रिंटर व संबंधित काट्रीज पुरवावीत, अशी मागणी सरकारी रेशन दुकानदार असोसिएशनच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात आली. रेशन दुकानदारांना गेल्या चार महिन्यांपासून कमिशन मिळालेले नाही. तसेच दुकानमालक भाडे देण्यासाठी वारंवार तगादा लावत आहेत. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांचा पगार, इतर स्टेशनरी वस्तू आणि वीजबिलही काही महिन्यांपासून थकले आहे. त्यामुळे आमच्याकडे थर्मल प्रिंटर खरेदी करण्यासाठी पैशांचा तुटवडा असून अन्न व नागरी पुरवठा खात्यानेच सर्व साहित्य पुरवावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
चार महिन्यांपासून कमिशन नसल्याने चिंतेत भर
राज्य शासनाकडून रेशन दुकानदारांना चार महिन्यांचे कमिशन मिळालेले नसून त्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. यातच आता अन्न व नागरी पुरवठा खात्याकडून रेशन दुकादानरांना थर्मल प्रिंटर घेण्याची सक्ती करण्यात येत आहे. यामुळे आधीच आर्थिक भार सहन करावा लागत असताना प्रिंटरही घेण्याचा आदेश खात्याने काढल्याने चिंतेत भर पडली आहे. यामुळे रेशन दुकानदार खात्याकडूनच प्रिंटर व काट्रीज पुरविण्याची मागणी करत असल्याचेही निवेदनात नमूद केले आहे. यावेळी राजशेखर तळवार, चंबण्णा होसमनी, दिनेश बागडे यांच्यासह असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.









