गडहिंग्लज प्रतिनिधी
केंद्र सरकारच्या अन्न व भेसळ विभागाचे अधिकारी असल्याचा सांगत गडहिंग्लज शहरातील बेकरी व्यापाऱ्यांच्याकडून पैसे उकळत असताना व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तोतया असल्याचे बिंग फोडले अन् त्या दोन बोगस अधिकाऱ्यांना जनतेने यथेच्छ धुलाई करत पोलीसांच्या ताब्यात दिले. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
गडहिंग्लजला मंगळवारी दुपारी शहरातील दसरा चौकात कर्नाटकातून चौघे चारचाकीतून (केए 49 एम 8842) आले. मुख्य रस्त्यावरील असणाऱ्या बेकरी व्यापाऱ्याकडून आम्ही केंद्र शासनाच्या अन्न व भेसळ विभागाचे अधिकारी असल्याचे सांगून तुमच्या दुकानात भेसळ माल असल्याचे निदर्शनास असल्याचे सांगत पैसे उकळण्याचे काम सुरू केले. ऑल इंडिया कौन्सिल ऑफ ह्युमन राईट्स (नार्थ कर्नाटक प्रेसिडेट) पाटी असणाऱ्या चारचाकीतून आलेले चौघे शहरातील जवळपास 6-7 दुकानातून तोतयांनी पैसे उकळले. शहरात अन्न व भेसळचे अधिकारी असल्याचे संघटनेचे पदाधिकाऱ्ययांनी फोनाफोनी करून याबाबत विचारणा सुरू केली. यावेळी अशी कोणतेही अधिकारी शहरात आले नसल्याची माहिती समोर आली. दरम्यान ते अधिकारी आपल्या गाडीतून शेंद्री रोडवरील धनगर मंदिराजवळ असणाऱ्या फरसाणाच्या फॅक्टरीत गेले होते. तेथील व्यापाऱ्याला 50 हजारांचा दंड सांगितला. यावेळी पाच हजारात तडजोड झाली होती. तेवढ्यात संघटनेच्या पदाधिकाऱ्याचा त्या व्यापाऱ्याला फोन आला अन् तोतया अधिकाऱ्यांचे बिंग फुटले. अधिकारी तोतया असल्याचे समताच तेथील जनतेने त्यांची यथेच्छ धुलाई करत पोलीसांच्या ताब्यात दिले. यावेळी दोघे तेथून पळून गेले तर गाडीचालक आणि एका तोतया अधिकाऱ्याला पोलीसांनी ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हे नोंदविण्याचे काम सुरू होते.
शहरात गणेशोत्सवाच्या काळात असा प्रकार घडल्याने व्यापारी वर्गात जोरदार चर्चा सुरू असून असे पैसे उकळत असणाऱ्यांवर पोलीसांनी कठोर करावाई करावी, अशी मागणी होत आहे.








