तिघाजणांची संयुक्त याचिका दाखल
प्रतिनिधी / फोंडा
फोंडा नगरपालिकेसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेले प्रभाग आरक्षण व फेररचनेला आव्हान देणारी तिघाजणांची संयुक्त याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक प्रदीप नाईक, माजी नगराध्यक्ष मनोज केणी व माजी उपनगराध्यक्ष विन्सेंत फर्नांडिस यांची ही याचिका आहे.
फोंडा पालिकेचा कार्यकाळ येत्या 20 मे रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे मे महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात पालिकेच्या 15 प्रभागांसाठी निवडणूक होण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे प्रभाग आरक्षण व फेररचना जाहीर करण्यात आली आहे, तिला आव्हान देण्यात आले आहे.
जाहीर करण्यात आलेल्या प्रभाग आरक्षण व फेररचनेला समान निकष लावण्यात आलेले नाहीत. काही प्रभाग सलग तीनवेळा आरक्षित तर काही प्रभाग सलग खुले म्हणजे जनरल ठेवण्यात आले आहेत. शिवाय प्रभाग फेररचना करताना नियम व निकषांना फाटा देण्यात आला आहे. पंधरापैकी किमान सात प्रभागांमध्ये मतदार यादीत फेररचना करताना भौगौलिक निकष दिसत नाहीत. बऱ्याच मतदारांची घरे एका प्रभागात असून मतदारयादीत त्यांची नावे दुसऱ्या प्रभागात नोंदविण्यात आली आहेत. प्रभाग फेररचनेमध्ये दाखल केलेल्या हरकतींची योग्य दखल न घेताच काही त्रोटक बदल कऊन मतदारयादी जाहीर करण्यात आली आहे. या दोन्ही मुद्द्यांवर न्यायालयात आव्हान याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती याचिकादारांनी दिली.
आरक्षण, फेररचनेत समान निकष नाहीत : प्रदीप नाईक
प्रभाग आरक्षण व फेररचनेत कुठलेच समान निकष दिसत नाहीत. आपण प्रतिनिधित्त्व करीत असलेला वारखंडे प्रभाग क्र. 8 सलग तिसऱ्यावेळी आरक्षित करण्यात आला आहे. या उलट शेजारील प्रभाग क्र. 6 व क्र. 7 सलग दोन कार्यकाळ खुले ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे आरक्षणाचे नेमके निकष स्पष्ट होत नाहीत. प्रभाग फेररचनेमध्येही असाच घोळ घालण्यात आला असून एकंदरीत फेररचना पाहिल्यास त्यात राजकीय हस्तक्षेप झाल्याचे स्पष्ट होत आहे, अशी प्रतिक्रिया माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक प्रदीप नाईक यांनी व्यक्त केला आहे.









