सूत्रधारासह पाचजण गजाआड : वर्षभर घातला होता धुमाकूळ,सर्व चोरटे बेतोडा गावातील
फोंडा : फोंडा पोलीस स्थानकाच्या हद्दीत मागील दीड वर्षापासून घरफोडी, फंडपेटी लांबविणे, देवळातील घंटा, समई व इतर साहित्य लंपास करीत धुमाकुळ घालणाऱ्या अट्टल चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात फोंडा पोलिसांना अखेर यश आले आहे.याप्रकरणी पाच संशयितांना फोंडा पोलिसांनी काल शुक्रवारी अटक केली आहे. संशयितांमध्ये मुख्य सूत्रधारासह तिघेजण गोमंतकीय असून दोघेजण बिगरगोमंतकीय आहेत.
फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कासरवाडा बेतोडा येथील एका फ्लॅटमध्ये स्वयंपाक गॅस सिलींडर चोरी झाल्याची तक्रार पोलीस स्थानकात दाखल झाल्यानंतर याप्रकरणाचे भिंग फुटले. याप्रकरणी प्रथम दोघा संशयितांना अटक करण्यात आली. त्यानंतर फोंडा पोलिसांनी दोघा संशयितांकडून कसून चौकशी करताना अन्य तिघा संशयितांचा समावेश असल्याची जबानी त्यांनी दिली, त्यानुसार अन्य तिघांना अटक करण्यात आली. संशयितांचा हा आकडा किती फुगेल हे सर्व चोरीचे साहित्य जप्त केल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
मास्टरमाईंड विश्वेश आनंद सालेलकर (28, गोठावाडा बेतोडा), शुभम भानू गावकर (28, तळ्योवाडा बेतोडा), रजत श्रीकांत नाईक (28,बेतोडा), देवशरण श्याम कार्तिक अगारिया (25, रा. बेतोडा मूळ मध्यप्रदेश), मोहम्मद अली जानू खान (26, रा. दत्तगड बेतोडा, मूळ उत्तरप्रदेश) अशा पाच संशयितांना अटक करण्यात आली आहे.
… अन् तुरूंगात पोहोचले
देऊळातील फंडपेटी गायब करून त्यातील पैसे उकळून बारमध्ये उशिरा रात्रीपर्यंत पार्ट्या करणे हा संशयितांचा उद्योग आहे. चोरीनंतर पंधरा दिवस गायब राहणे. कुणाच्याही नजरेस न पडणे, असा या चोरट्यांचा दिनक्रम होता. मास्टरमाईड सालेलकरचे अन्य अनेक साथीदार असून त्यांचांही शोध पोलीस घेत आहेत. लाखो रूपयांच्या चोरी पकडले नाही आणि एका स्वयंपाक गॅस सिलींडरच्या चोरीत गुंतल्याने अडचणीत आणल्याचा पश्चाताप चोरटयांना कदाचित होत असावा. चोरीनंतर सोन्याचे दागिने ज्या सराफी दुकानदारांना विकले त्यांचे आणि चोरीतील अन्य सामान विकलेल्या भंगार अड्डेवाल्यांचेही दाबे दणाणले आहेत. संशयितांनी काही सराफी दुकानदार व भंगाअड्डयावाल्याची नावे घेतली आहे.
सर्व चोरटे बेतोड्यात वास्तव्यास
मागील दीड वर्षापासून बेतोडा व आसपासच्या परिसरात मंदिरफोंडया, घरफोडी प्रकरणात या चोरट्यांचा समावेश असल्याचे पक्के पुरावे पोलिसांच्या हाती लागलेले आहेत. देवळातील तांब्याच्या घंटा, समईचे घबाड संशयिताच्या ताब्यात असल्याची पक्की माहिती पोलिसांना मिळाली आहे. सर्व चोरटे बेतोड्यात वास्तव्यास असतात.
बेतोडा आऊट पोस्ट संशयाच्या घेऱ्यात
रात्रीच्या काळोखात दाट पावसाच्या आड चोरी करून फरार होत असलेल्या चोरटयांना स्थानिक पोलीस बीट आऊट पोस्टकडून अभय मिळत असल्याच्या संशयाच्या स्थानिक लोकांच्या तक्रारी होत्या. त्यामुळेच स्थानिक चोरटे फोफावत होते. चोरटे व आऊट पोस्टवरील कर्मचाऱ्यांच्यात धागेदोरे असण्याची शक्यत व्यक्त केली जात असून तपासणी होणे तेवढेच गरजेचे आहे. एकाच जागी कित्येक वर्षे बस्तान बसविल्यानंतर चोरटे व पोलीस परिचयाचे झाल्याने असे प्रकार घडत असल्याची चर्चा सद्या बेतोड्यात रंगत आहे.
सूत्रधाराच्या छातीत दुखू लागले
या घटनेनंतर चोरट्यांच्या या टोळीचा सूत्रधार विश्वेश सालेलकर याच्या छातीत अचानक कळ आल्याने त्याला उपचारांसाठी बांबोळी येथील गोमेकॉत हलविण्यात आले आहे. चोरी करताना छातीत कळा आल्या की त्यानंतर चोरीप्रकरणी नाव गुंतल्याने स्पष्ट झाल्यानंतर त्याच्या छातीत दुखू लागले याचीही फोंडा पोलीस कसून चौकशी करीत आहे. याप्रकरणी फोंडा पोलिसांनी पाचही संशयिताविरोधात भारतीय न्याय संहितेच्या 305, 331 (3) कलमाखाली गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली आहे. आज त्यांना रिमांडसाठी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. याप्रकरणी दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक सुनिता सावंत, उपअधीक्षक आर्शी आदील यांच्या मार्गदर्शनाखाली फोंडा पोलीस स्थानकाचे निरीक्षक विजयनाथ कवळेकर व टीमने ही मोहीम फत्ते केली. फोंडा पोलीस टिममध्ये उपनिरीक्षक संकेत तळकर, सुशांत गावकर, हवालदार केदारनाथ जल्मी, कॉन्स्टेबल अमेय गोसावी, आदित्य नाईक यांचा समावेश आहे.