रॉय नाईकसह पाच उमेदवार : नगरसेवक विरेंद्र ढवळीकर दुसऱ्यांदा रिंगणात
फोंडा : फोंडा नगरपालिकेच्या निवडणुकीत शांतीनगर पार्ट प्रभाग 1 मध्ये एकूण पाच उमेदवार रिंगणात असून फोंड्याचे आमदार तथा मंत्री रवी नाईक यांचे पुत्र रॉय नाईक हे या प्रभागातून निवडणूक लढवित आहेत. त्यामुळे या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. भाजपा पुरस्कृत फोंडा नागरिक समितीचे ते उमेदवार आहेत. डॉ. केतन भाटीकर यांच्या नेतृत्त्वाखालील मगो रायझिंग फोंडा पॅनलतर्फे नंदकुमार डांगी तर राजेंद्र नागवेकर यांना राजेश वेरेकर यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला आहे. शेजारील कुरतरकरनगरी प्रभाग 2 मध्ये नगरसेवक विरेंद्र ढवळीकर व राजेश सिनाय तळावलीकर यांच्यात थेट लढत होणार आहे. शांतीनगरचा काही भाग मिळून प्रभाग 1 ची रचना करण्यात आली असून बोणबागच्या सिमेपर्यंत हा प्रभाग विस्तारला आहे. या प्रभागामध्ये स्थानिक मतदारांबरोबरच स्थलांतरीत अर्थात मजूर व कामगार वर्गातील मतदारांची संख्याही बरीच आहे. मागील निवडणुकीत महिलांसाठी हा प्रभाग आरक्षीत होता व भाजपा पॅनलमधून अर्चना डांगी या निवडून आल्या होत्या. यंदाच्या निवडणुकीत सर्व उमेदवार नवीन चेहरे आहेत. मंत्री रवी नाईक यांचे पुत्र रॉय नाईक नगरपालिका निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा सक्रीय राजकारणात उतरत असल्याने या प्रभागामधील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. भाजपा पुरस्कृत फोंडा नागरिक समिती पॅनलचे ते उमेदवार आहेत. मगो रायझिंग फोंडा पॅनलतर्फे नंदकुमार डांगी हे तर काँग्रेस समर्थक उमेदवार म्हणून राजेंद्र नागवेकर हे रिंगणात आहेत. याशिवाय लवलेश उर्फ तुषार कवळेकर व ज्योती केशव कुलकर्णी हे दोन अपक्ष उमेदवार अशा पाच उमेदवारांमध्ये ही बहुरंगी व रंगतदार लढत होणार आहे. भाजपा व मगो पक्षासाठी ही लढत प्रतिष्ठेची बनून राहिली आहे. काँग्रेस पक्षाने काही मोजक्याच प्रभागांमध्ये उमेदवारांना पाठिंबा दिला असून त्यापैकी प्रभाग 1 मधील राजेंद्र नागवेकर हे एक आहेत. प्रभागातील नागरिकांच्या समस्या आणि विकास या दोनच मुद्द्यांवर सर्व पाचही उमेदवारांनी प्रचारावर भर दिला आहे.
प्रभाग 2 मध्ये भाजपा-मगो उमेदवारांमध्ये थेट लढत
कुरतरकरनगरी प्रभाग 2 मध्ये नगरसेवक विरेंद्र ढवळीकर व राजेश सिनाय तळावलीकर हे दोघे उमेदवार रिंगणात आहे. ढवळीकर हे भाजपा तर तळावलीकर हे मगो पॅनलचे उमेदवार असल्याने एका अर्थाने भाजपा विऊद्ध मगो असाच हा थेट सामना होणार आहे. विरेंद्र ढवळीकर हे दुसऱ्यांदा निवडणूक लढवित असून मागील निवडणुकीत मगो रायझिंग फोंडाच्या पॅनलमधून ते निवडून आले होते. मध्यंतरी त्यांनी भाजपात प्रवेश केला व ते काही काळ उपनगराध्यक्षही बनले. राजेश तळावलीकर हे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेविका गिताली तळावलीकर यांचे पती आहेत. विशेष म्हणजे गिताली या प्रभाग 15 मधून तर राजेश हे प्रभाग 2 मधून एकाचवेळी निवडणूक लढवित आहेत. प्रभागाचा विकास व प्रलंबित विकासकामे मार्गी लावणे हा दोन्ही उमेदवारांचा प्रचाराचा प्रमुख मुद्दा आहे. भाजपासाठी ही जागा जिंकणे जेवढे महत्त्वाचे आहे, तेवढेच मगोला आपले काही मागील राजकीय हिशेब चुकते करण्यासाठी ही जागा जिंकणे प्रतिष्ठेचे बनले आहे.









