राजकारण्यांचे राजकारण मात्र जोरात : मगो-भाजपात संघर्ष, विरोधकांत आनंद
फोंडा : फोंडा मतदारसंघात सध्या निवडणुकीच्या प्रचारासारखे पडघम वाजू लागले आहेत. निवडणुकीला अद्याप दोन वर्षाचा कार्यकाळ असला तरीही ऐन मार्च महिन्याच्या उकाड्यात प्रभूनगर येथील पाणीबाणीसाठी राजकारण तापल्याचे चित्र दिसत आहे. मगो व भाजपामध्ये सत्तेत युती असतानाही फोंड्यात भाजपा विरूद्ध मगो असा संघर्ष पाहायला मिळत आहे. याचा आनंद राज्यात विरोधी पक्षाच्या भूमिकेत असलेला काँग्रेसचा आमदार व फोंडावासीय घेत आहेत. दाग-फोंडा येथील पाणी विभागाच्या कार्यालयात प्रभूनगर येथील पाण्याच्या समस्येसाठी ग्रामस्थ आपल्या नेत्यासह धडकले. त्याही पुढे जाताना स्थानिक आमदारांवर आरोप करून तोंडसुख घेतल्यानंतर त्याच्याकडे याप्रकरणी कोणतीच गाऱ्हाणे न घालता पोलिसस्थानक गाठून तक्रार दाखल केली. त्यानंतर थेट मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे मोर्चा वळविला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याप्रकरणी दोन दिवसात पाण्याची समस्या सोडविण्याचे आश्वासन देऊन त्यांना माघारी पाठविले.
दोन्ही नेत्यांच्या मोर्चामध्ये तेच लोक
सोमवार उजाडला तरीही नळ कोरडेच होते. यासाठी मध्यस्थी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या खास मर्जीतल्या नेत्याने प्रभूनगर येथील आंदोलनासाठी पुढारलेल्या ग्रामस्थांना संपर्क साधून दाग फोंडा येथील पाणीविभागाच्या कार्यालयातील साहाय्यक अभियंत्याला घेराव घातला. याप्रश्नी समर्पक उत्तरे ऐकल्यानंतर ग्रामस्थ माघारी फिरत असताना प्रसारमाध्यमांशी बोलत असताना याप्रकरणाची पोल फुटली. कोणी कोणाला बोलावले? पाणीप्रश्नासाठी पुढाकार घेतला की राजकीय स्वार्थासाठी दोघा नवख्या नेत्यांमध्ये रस्सीखेच अशी जणू फोंड्यात स्पर्धा सुरू झालेली पहायला मिळाली. मागील पंधरा दिवसांपूर्वी एका गटातून शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन केले. लागलीच दुसऱ्या गटाने बॉडी बिल्डींगचे आयोजन करून दंड थोपटले होते.
पाणीपुरवठा विभागातही राजकारण दाग-फोंडा येथे मागील काही वर्षांपासून ठाण मांडलेल्या अभियंत्याची बदली दुसरीकडे झाली आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभागात कार्यरत असलेल्या त्याच्या मर्जीतील कर्मचाऱ्यांची कोंडी झालेली आहे. मागील कित्येक वर्षे त्याच प्रभागात सेवा दिल्यानंतर पाणी सोडण्याचे व्हॉल्व कुठे आहेत हे त्यांना पुरेपुर माहीत आहे. साहेब गेल्यामुळे ते परत येईपर्यंत हा खेळ चालवायचा का? अशा राजकारणातून सध्या पाणीपुरवठा विभाग जात असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. सध्या कार्यरत असलेल्या सहाय्यक अभियंत्याने पाणीपुरवठा करण्यासाठी टँकरची सोय केलेली असून क्हॉल्वसंबंधी माहिती जाणून घेण्यासाठी जाणकारांशी संपर्क साधल्याची माहिती प्राप्त झालेली आहे.
‘हर घर नल से जल’ नारा कुठे?
यावर तोंडसुख घेताना राज्यात विरोधी पक्षाच्या भूमिकेत असलेल्या कॉंग्रेस पक्षाचे फोंड्यातील नेते राजेश वेरेकर म्हणाले की, भाजपा व मगो दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते युतीच्या सरकारमध्ये आहेत. तरीही फोंड्यातील दोन्ही प्रॉक्सी आमदारांचे शीतयुद्ध सुरू आहे. मंत्री असलेले खुद्द स्थानिक आमदार याप्रकरणी आनंद घेत आहेत. पाणी टंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी मोठा गाजावाजा कशाला करायचा? यापैकी कुणीच स्थानिक आमदार असलेल्या मंत्र्यांकडे गाऱ्हाणे घेऊन का गेले नाही? यावरून राज्यातील भाजपा सरकारचा ‘हर घर नल से जल’ नारा सपशेल अपयशी ठरल्याचा आरोप राजेश वेरेकर यांनी केला आहे.









