ऑनलाईन टीम / तरुण भारत :
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर मुंबई आणि नांदेडमध्ये भाडोत्री व्यक्तींकडून पाळत ठेवली जात आहे. संबंधित व्यक्ती त्यांचा पाठलाग करून भेटीगाठींची आणि प्रवासाची माहिती संकलित करीत असल्याने घातपाताची शक्यता चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. याप्रकरणी त्यांनी नांदेड पोलिसात तक्रार दिली आहे. दरम्यान, अशोक चव्हाण हे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांची काही शासकीय पत्रे मिळवून अज्ञात व्यक्तींनी त्यातील सही कायम ठेवून बनावट कोरे लेटरहेड तयार केल्याचेही समोर आले आहे.
यासंदर्भात अशोक चव्हाण यांनी ट्विट करत म्हटले आहे की, मराठा आरक्षणासंदर्भात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले एक खोटे पत्र मला मिळाल्याने मी तातडीने नांदेडचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांची भेट घेऊन याबाबत लेखी तक्रार दाखल केली. यापूर्वीही माझ्या सहीचे कोरे लेटरहेड तयार करण्यात आले आहेत. भविष्यात खोटे दस्तऐवज तयार करुन त्यांचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. आगामी काळात अनेक निवडणुका असून, राजकीय दृष्टय़ा प्रतिमाहनन व जनतेत गैरसमज निर्माण करण्यासाठी हे बनावट दस्तऐवज तयार केले असावेत, असा माझा संशय आहे.
अधिक वाचा : भाजपचे तळवे चाटण्यासाठी शिवसेनेचा जन्म झाला नाही
बनावट पत्रे तयार करून विविध समाजात शंका-कुशंका निर्माण करून सामाजिक शांतता तसेच कायदा व सुव्यवस्था भंग करण्याचाही प्रयत्न असू शकतो. तसेच मुंबई आणि नांदेडमध्ये माझ्यावर भाडोत्री व्यक्तींकडून पाळत ठेवली जाते आहे. त्यामुळे घातपाताची शक्यता आहे. या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांनी कायदेशीर दृष्टय़ा योग्य दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे.