वार्ताहर,मुरगूड
Sanjay Mandalik News : अतिरिक्त साखर निर्यात करण्यासाठी केंद्र शासनाने साखर निर्यात धोरण लवकर जाहिर करावे यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिपादन चेअरमन खासदार संजय मंडलिक यांनी केले. लोकनेते सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखान्याच्या 27 व्या वार्षिक सभेत ते बोलत होते.
खासदार मंडलिक म्हणाले, साखर निर्यात धोरणामुळे साखरेस प्रति क्विंटलला 3,600 रुपयापर्यंत दर मिळत आहेत्. मात्र साखर कारखान्यांचा उत्पादन खर्च विचारात घेता प्रति क्विटलला 3,600 ते 3,700 दर मिळणे अत्यंत गरजेचे आहे. तरच शेतकऱ्यांना ऊस बिले, कारखान्यांने बँकाकडून घेतलेल्या कर्जांची परतफेड, नोकर पगार व इतर अनुषंगीक खर्च यांचा आर्थिक मेळ घालता येणार आहे. यासाठी यावर्षीही परदेशात साखर निर्यात करण्याचे धोरण कायम करून ते लवकरात लवकर जाहिर करण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणार आहे.
राज्यातील ऊस अन्य राज्यात जाऊ नये, यासाठी राज्य शासनाने घेतलेले धोरण साखर कारखानदारीसाठी योग्य आहे. राज्यात 1 नोव्हेंबरपासून गळीत हंगाम सुरू होण्याची शक्यता असून सहा लाख मेंट्रीक टन ऊस गाळपाच्या उद्दिष्ठ पूर्तीसाठी सभासद, ऊस उत्पादक यांनी पिकवलेला संपूर्ण ऊसाचा पुरवठा करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी अहवालातील संक्षिप्त माहीती संचालक अॅड. वीरेंद्र मंडलिक यांनी दिली. विषय पत्रिका वाचन कार्यकारी संचालक एन. वाय. पाटील यांनी केले. प्रास्ताविक संचालक सत्यजित पाटील (सोनाळीकर) यांनी केले. यावेळी अतुल जोशी, अॅड. रेखा भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. एस. व्ही. चौगले, जयसिंग भोसले, माधवराव घाटगे, सर्जेराव अवघडे, अनिल माळी, संजय पाटील, दत्तात्रय मोहिते यांनी चर्चेत भाग घेतला.
सभेस उपाध्यक्ष शिवाजीराव इंगळे, सर्व संचालक यांच्यासह मारुती काळुगडे, मसू पाटील, नारायण मुसळे, आर. डी. पाटील, केशवकाका पाटील, बाजीराव गोधडे, राजेखान जमादार, सभासद उपस्थित होते. स्वागत एन. वाय. पाटील यांनी केले. सुत्रसंचालन प्रा. रवींद्र शिंदे यांनी केले. राष्ट्रगीताने सभेची सांगता झाली.