खडेबाजारसह अनेक पोलीस स्थानकांमध्ये शांतता समितीची बैठक : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सूचना
बेळगाव : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खडेबाजार पोलीस स्थानकासह विविध पोलीस स्थानकांमध्ये शांतता समितीच्या बैठकी पार पडल्या. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी, गणेशोत्सव अत्यंत शांततेत साजरा करा, इतर धर्मियांच्या भावना दुखावू नयेत यासाठी काळजी घ्या, जिल्हा प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करा, अशा सूचना केल्या. खडेबाजारचे एसीपी अरुणकुमार कोळ्ळूर व प़ोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांना बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार खडेबाजार परिसरातील बहुसंख्य गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती. यावेळी दिलीप निंबाळकर यांनी गणेशोत्सव उत्साहात साजरा करा. मात्र, यामुळे कोणत्याही नियमांचा भंग होऊ नये याची काळजी घ्या, असे सांगितले.
गणेशोत्सव साजरा करताना लावण्यात येणारे स्पीकर, डीजे कमी आवाजात लावावेत. रात्री 10 नंतर पहाटे 6 पर्यंत डीजे व स्पीकरला पूर्णपणे बंदी आहे. तेव्हा त्या नियमांचे पालन करावे, असे त्यांनी सांगितले. विद्युत कनेक्शन घेताना नियमानुसार घ्या. मंडपाला धोका निर्माण होऊ नये याबाबत खबरदारी घ्या, भक्तांकडून दडपशाही करत देणगी जमा करू नका. इतर धर्मियांच्या भावना दुखावण्याबाबत कोणत्याही प्रकारची गाणी व भाषणाचे ऑडिओ-व्हिडिओ प्रसारित करू नका, असे त्यांनी सांगितले. गणेशोत्सवासाठी घालण्यात येणाऱ्या मंडपामुळे रहदारीला त्रास होऊ नये, याची देखील खबरदारी घ्या. मंडपामध्ये स्वत:चे स्वयंसेवक ठेवावेत, असेही त्यांनी सांगितले. गणेश आगमनादिवशी तसेच विसर्जनादिवशी काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीवेळीही सर्व नियमांचे पालन करावे. जेणेकरून हा सण अत्यंत उत्साहात आणि सुरळीतपणे पार पडेल, असे त्यांनी सांगितले. यावेळी विविध मंडळांच्या कार्यकर्त्यांनी काही सूचना मांडल्या. खडेबाजार, मार्केट पोलीस स्थानक, टिळकवाडी पोलीस स्थानकासह इतर पोलीस स्थानकांमध्येही शांतता समितीची बैठक पार पडली. त्यांनाही पोलीस निरीक्षकांनी आणि इतर अधिकाऱ्यांनी सूचना केल्या आहेत.









