डॉ. माणिक बेंगेरी यांचे प्रतिपादन : शहरात गुरुपौर्णिमा उत्साहात : शिक्षकांच्या ऋणानुबंधाविषयी विचारमंथन: विविध कार्यक्रमांचेही आयोजन
बेळगाव
बालिका आदर्श विद्यालय
विद्यार्थीदशेतच अधिक परिश्रम घेऊन ज्ञान संपादन करून स्वत:ला समर्थ व आत्मनिर्भर बनवा. गुरुजन व आई-वडिलांच्या आदर्शाने वाटचाल करा, असे आवाहन डॉ. माणिक बेंगेरी यांनी केले. येथील बालिका आदर्श विद्यालयात आयोजित गुरुपौर्णिमा कार्यकमात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी टी.एफ.ई. सोसायटीचे चेअरमन जी. एन. फडके होते. प्रमुख पाहुण्या म्हणून उगार येथील समाजसेविका स्मिता शिरगावकर होत्या. संचालक लता कित्तूर, आनंद गाडगीळ, डॉ. शरयू हंजी उपस्थित होते. माणिक बेंगेरी म्हणाल्या, काळानुसार अभ्यासक्रम बदलत चालला आहे. यापूर्वी अभ्यासक्रमात असणारी संस्कृतची सुभाषिते आता गायब झाली आहेत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. काळानुसार अभ्यासक्रम बदलला तरी गुरुजनांनी संस्कारक्षम विद्यार्थी घडवावेत, असे आवाहन डॉ. बेंगेरी यांनी केले. स्मिता शिरगावकर यांनी मनोगत व्यक्त केले. शाळेला गुरुदक्षिणा म्हणून देण्यात आलेल्या संस्थापक सुमित्राबाई सोहनी व कमलाबई छत्रे यांच्या अर्धपुतळ्यांचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. विद्यार्थिनींनी ईशस्तवन सादर केले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यकमाला प्रारंभ करण्यात आला. शिक्षक विजय पार्लेकर, यशश्री किंकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन कीर्ती चिंचणीकर यांनी केले. मुख्याध्यापक एन. ओ. डोणकरी यांनी आभार मानले.
पतंजली-इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स
पतंजली योग समिती बेळगाव व इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स यांच्यावतीने गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी जोतिबा भादवणकर यांनी अग्निहोत्र केले. बेविनकोप्प बैलहोंगल येथील विजयानंद स्वामींच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्सचे अध्यक्ष रमेश जंगल यांनी ओम प्रतिमेचे पूजन केले. मोहन बागेवाडी यांनी प्रास्ताविक करून पतंजली योग समितीच्या कार्याची माहिती दिली. किरण मन्नोळकर यांनी रामदेव बाबांचा जीवनपट उलगडला. विजयानंद स्वामी यांनी महर्षी पतंजली अष्टांगयोगाबद्दल माहिती दिली. स्वामी विजयानंद यांनी संस्काराचे महत्त्व सांगितले. यावेळी दानशूर विठ्ठल हेगडे यांचा स्वामींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सर्व योग शिक्षकांना पुष्प आणि योगाचा चार्ट देण्यात आला. चंद्रकांत खंडागळे यांनी आभार मानले. याप्रसंगी संगीता कोनापुरे, व्ही. बी. जाऊर, शंकर कुदरी, बालताई कडकभावी, इरण्णा बी. के. उपस्थित होते. पतंजली योग समिती खानापूरतर्फे पहाटे 5.30 ते 7 या वेळेत गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. प्रारंभी अग्निहोत्र करून गुरुचा महिमा आणि स्वामीजींच्या जीवन कार्याबद्दल माहिती देण्यात आली. नृसिंह भट्ट, सुभाष देशपांडे, निर्मला देसाई तसेच बेळगावहून उमा, मोहन बागेवाडी, किरण मन्नोळकर व पुरुषोत्तम पटेल उपस्थित होते.
जीएसएस कॉलेज
एसकेई सोसायटीच्या जीएसएस पीयू कॉलेज आणि महाविद्यालयात गुरुपौणिमेचे आयोजन करण्यात आले होते. गुरुपौर्णिमेनिमित्त विद्यार्थी आणि शिक्षकांचे ऋणानुबंध, आजच्या जीवनात गुरुचे महत्त्व याविषयी विचारमंथन करण्यात आले. प्राचार्य एस. एन. देसाई यांनी स्वागत केले. यावेळी प्रा. अवधूत जोशी, गुरुराज वालीकर, प्रा. सोनाली, जयश्री कलंगुटकर यांनी विचार मांडले. अध्यक्षस्थानावरून प्राचार्य बी. एल. मजुकर यांनी गुरु-शिष्याचे नाते उलगडून दाखविले. अनघा वैद्य यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सोनाली यांनी आभार मानले.
दैवज्ञ ब्राह्मण संघ
दैवज्ञ गणेशोत्सव, दैवज्ञ ब्राह्मण संघ यांच्यावतीने गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. श्री श्री सच्चिदानंद स्वामींच्या प्रतिमेची पाद्यपूजा रमेश पाटणकर यांनी केली. सर्व सभासदांनी फुले अर्पण केली. यानंतर कालिकादेवीची महाआरती करण्यात आली. सोमण भटजी यांनी पौरोहित्य केले. याप्रसंगी संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते.
पतंजली योग समिती
पटवर्धन ले-आऊट, वडगाव येथे पतंजली योग समितीतर्फे गुरुपौर्णिमा साजरी केली. समितीच्या कर्नाटक राज्य प्रभारी आरती कानगो, अमरेंद्र कानगो यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. प्रारंभी होमहवन व मंत्रोपचार झाले. त्यानंतर 78 वर्षांच्या वनिता पाटील यांनी गणेशवंदना नृत्य केले. भजन, बासरी वादन, नृत्याद्वारे योग प्रात्यक्षिके, गीतापठण, साष्टांग योग, आयुर्वेद, गुरुचे महत्त्व यावर माहिती देण्यात आली. वैशाली व आरती पाटील यांनी सूत्रसंचालन केले. नंदिनी चौगुले यांनी आभार मानले.









