अडचणी येत असल्याने येळ्ळूर येथील पाटील समाजाचा महत्त्वपूर्ण निर्णय
येळ्ळूर : येळ्ळूर येथील पाटील समाजाचा विस्तार वाढत चालला आहे. त्यामुळे कोणताही सण असो किंवा धार्मिक कार्यक्रम असो सोयर किंवा सुतक यामुळे तो कार्यक्रम रद्द करावा लागत होता. त्यामुळे येळ्ळूर येथील पाटील समाजाने त्याला कमी वेळेची मर्यादा घालण्यासाठी बैठक बोलविली. त्यामध्ये सोयर किंवा सुतक पाळण्यासाठी ठराव करण्यात आले. पहिल्यांदाच येळ्ळूरमध्ये असे ठराव करण्यात आले आहेत. यामुळे पाटील समाजाचे कौतुक होत आहे. समाज वाढत चालल्याने अडीअडचणी येत होत्या. त्यामुळे पाटील समाजाने याबाबत निर्णय घेण्याचे ठरविले. मधला आणि खालचा तरफ यांची ही बैठक झाली. यामध्ये आपल्या तरफातील एखाद्या व्यक्तीचे निधन झाले तर केवळ तीन दिवस सुतक पाळले जावे. ज्या घराण्यातील व्यक्ती दगावली आहे त्यांनीच केवळ 12 दिवस सुतक पाळण्यास हरकत नाही, असे ठरविण्यात आले. पाटील घराण्याचे मूळ वंशज हणमंत गौड यांचे थडगे बांधण्यात आले आहे.
त्याठिकाणी बकरे किंवा कोंबडा यांचा मान दिला जातो. जर तिन्ही तरफातील एखाद्या व्यक्तीचे निधन झाले असेल तर तीन दिवस हा मान देता येणार नाही, असा ठरावही करण्यात आला. पाटील समाजाचे एकूण तीन तरफ आहेत. यामधील दोन तरफांनी हा निर्णय घेतला आहे. यामुळे सर्वांतून समाधान व्यक्त होत आहे. हणमंत गौड ट्रस्टचे अध्यक्ष सी. बी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. प्रारंभी अनिल पाटील यांनी बैठकीचा उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर आनंद पाटील यांनी तयार करण्यात आलेला ठरावांचे वाचन केले. ग्रा. पं. माजी अध्यक्ष सतीश पाटील यांनी या मागचा उद्देश स्पष्ट केला. समाजाने एकत्र येऊन हा निर्णय घेतला आहे. त्याला सर्वांनी मान्यता दिली आहे. यामुळे यापुढे या नियमानुसारच प्रत्येकाने सण तसेच इतर कार्यक्रम साजरे करायचे आहेत. मंगळवार दि. 14 रोजी थडेदेव येथे ही बैठक झाली. बैठकीला डी. जी. पाटील, माजी ग्रा. पं. सदस्य शिवाजी पाटील, अनंत पाटील, परशराम पाटील, मनोहर पाटील, यल्लुप्पा पाटील, डॉ. एम. आर. पाटीलसह मोठ्या संख्येने दोन्ही तरफातील ज्येष्ठ मंडळी, तरुण उपस्थित होते. विश्वनाथ पाटील यांनी गाऱ्हाणे घातले.









