अप्पर जिल्हाधिकारी होनकेरी : जिल्हा प्रशासनातर्फे श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी
बेळगाव : भगवान श्रीकृष्णांच्या सत्य, न्याय, धर्म, नीति मार्गांचा सर्वांनी अवलंब करून वाटचाल करावी. धर्माबद्दलची त्यांची निष्ठा, आदर्श यांचे पालन करून श्रेष्ठ राष्ट्र निर्माण करावे, असे निवासी जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी यांनी सांगितले. जिल्हा प्रशासन, जि. पं., कन्नड आणि सांस्कृतिक खाते व मनपाच्या संयुक्त विद्यमाने कुमार गंधर्व रंगमंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी कार्यक्रमावेळी बोलत होते. ते म्हणाले, श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्याबरोबरच श्रीकृष्णांच्या तत्व-सिद्धांताचे पालन करून एकमेकांविषयी प्रेम, विश्वास, शांती, सुव्यवस्था राखावी, असे सांगितले.
संपूर्ण देशात भगवान श्रीकृष्णाची पूजा केली जाते. धर्माच्या मार्गावर सर्वांनी चालले पाहिजे. महाभारतामध्ये धर्माची शिकवण दिल्यामुळेच पांडवांचा विजय झाला. त्यानुसार समाजामध्ये सर्वांनी श्रीकृष्णाचे तत्वज्ञान आचरणात आणले पाहिजे, असे प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी शुभम शुक्ला यांनी सांगितले. यावेळी रवि शास्त्राr यांनी श्रीकृष्ण व यादव काळ याबाबत माहिती दिली. यावेळी कन्नड आणि सांस्कृतिक खात्याच्या उपसंचालक विद्यावती बजंत्री, गजपती मठाचे श्रीकृष्ण कुमार स्वामी, मंजुनाथ पाटील, यादव समाजाचे जिल्हा अध्यक्ष शीतल मुंडे, जयगौडा पाटील, एन. एन. पाटील, हेस्कॉम अधिकारी संजीव हणमण्णावर, नगरसेवक बसवराज मुद्देकर, घटप्रभा साखर कारखान्याचे संचालक शिवलिंग पुजारी आदी उपस्थित होते. तत्पूर्वी महापौर शोभा सोमनाचे यांच्या हस्ते श्रीकृष्ण भावचित्र मिरवणुकीला चालना देण्यात आली. किल्ला तलाव येथून मिरवणुकीला प्रारंभ करून आरटीओ चौक, एस. पी. ऑफीस रोडमार्गे कुमार गंधर्व रंगमंदिर येथे सांगता करण्यात आली. यावेळी उपमहापौर रेश्मा पाटील आदी उपस्थित होते.









