अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान : साध्वी ऋतुंभरा यांना पद्मभूषण गौरव
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना मंगळवारी राष्ट्रपती भवनात दुसऱ्या टप्प्यातील पद्म पुरस्कार प्रदान केले आहेत. लोकगायिका दिवंगत डॉ. शारदा सिन्हा यांना मरणोत्तर पद्मविभूषण जाहीर झाला होता, हा पुरस्कार त्यांच्या पुत्राने राष्ट्रपतींच्या हस्ते स्वीकारला आहे. तर दिग्गज मराठी अभिनेते अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत डॉ. मनोहर जोशी यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार त्यांच्या कुटंबीयांनी स्वीकारला आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, विदेशमंत्री एस. जयशंकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
अभिनेते अशोक सराफ यांना अभिनयक्षेत्रातील बहुमूल्य योगदानासाठी पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आल्याने त्यांच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. अशोक सराफ हे अनेक दशकांपासून मराठी चित्रपटसृष्टी, नाटक तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत सक्रीय आहेत. दमदार अभिनयासाठी ओळखले जाणारे अशोक सराफ यांचा मोठा चाहतावर्ग आहे.
तसेच अभिनेते अनंत नाग यांना कला क्षेत्रातील योगदानासाठी पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. राम मंदिर आंदोलनात सामील राहिलेल्या साध्वी ऋतुंभरा यांना सामाजिक कार्यासाठी पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. यापूर्वी 28 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील पुरस्कार वितरण सोहळ्यात 71 मान्यवरांना पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्रीने गौरविण्यात आले होते. केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला 139 पद्म पुरस्कारांची घोषणा केली होती.
कुमुदिनी रजनीकांत लाखिया (मरणोत्तर)-कला
कुमुदिनी रजनीकांत लाखिया यांना कलाक्षेत्रातील योगदानासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने गौरविले आहे. लाखिया यांच्या नातवाने हा पुरस्कार स्वीकारला.
विवेक देवरॉय (मरणोत्तर)-साहित्य अन् शिक्षण
साहित्य आणि शिक्षणाच्या क्षेत्रातील योगदानासाठी विवेक देवरॉय यांना राष्ट्रपतींनी मरणोत्तर पद्मभूषणने सन्मानित केले. त्यांच्या पत्नीने हा पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते स्वीकारला आहे. विवेक देवरॉय हे अर्थतज्ञ होते, तसेच त्यांनी पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष म्हणून कार्य केले होते. याचबरोबर ते साहित्याच्या क्षेत्रात कार्यरत होते.
रिकी केज : कला-संगीत
ग्रॅमी पुरस्कार विजेते संगीतकार रिकी केज यांना कला-संगीत क्षेत्रातील योगदानासाठी राष्ट्रपती मुर्मू यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविले आहे.
डॉ. शोभना चंद्रकुमार : कला-लोकनृत्य
डॉ. शोभना चंद्रकुमार यांना कला-लोकनृत्याच्या क्षेत्रातील भरीव योगदानासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.









