पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांची घोषणा : माशेलात चिखलकाला महोत्सवाचे उद्घाटन
वार्ताहर /माशेल
गोवा हा समुद्र किनारे व पार्ट्यांसाठी प्रसिद्ध नाही, तर येथे संस्कृती, परंपरा व उत्सवाचा समृद्ध वारसाही आहे. चिखलकाल्यासारख्या पारंपरिक उत्सवातून जगभरातील पर्यटकांना हे दाखविले पाहिजे. त्यादृष्टीने पर्यटन खात्याने विशेष धोरण आखले असून यापुढे वीरभद्र व अन्य लोकोत्सवांना प्रोमोट केले जाणार आहे, असे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी जाहीर केले. माशेल येथील प्रसिद्ध चिखलकाला यंदा राज्य उत्सव म्हणून जाहीर करण्यात आला असून यानिमित्त येथील श्री देवकीकृष्ण मैदानावर तीन दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यटन खात्यातर्फे हा चिकलकाला महोत्सव साजरा करण्यात येत आहे. महोत्सवाचे उद्घाटन बुधवारी रात्री पर्यटनमंत्री रोहन खंवटे व कला आणि संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी मंत्री खंवटे बोलत होते. व्यासपीठावर देवकीकृष्ण देवस्थानचे अध्यक्ष गिरीश धारवाडकर, चिखलकाला प्रमुख अॅङ किशोर भगत, पर्यटन खात्याचे संचालकर सुनिल अंचिपका आदी मान्यवर उपस्थित होते. गोव्यातील बहुतेक मंदिरांना प्राचिन इतिहास असून यापैकी बहुतेक मंदिरे फोंडा तालुक्यात आहेत. त्यामुळे मंदिर पर्यटनालाही चालना देण्यासाठी आगामी काळात विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्री गोविंद गावडे म्हणाले, गोव्याची संस्कृती व समृद्ध उत्सव परंपरा पर्यटनाच्या माध्यमातून जगभर पोचविण्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांचे प्रयत्न स्तुत्य आहेत. पर्यटनाच्या माध्यमातून प्रियोळ मतदार संघाचा विकास साधणार असल्याचा शब्द त्यांनी पाळला आहे. या महोत्सवामुळे माशेलच्या पारंपरिक चिखलकाल्याला व्यापक स्वऊप प्राप्त झाले असून आमच्यासाठी ही अभिमानाची गोष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले. महोत्सवाची सुऊवात प्रख्यात गायक कलाकार राहूल देशपांडे यांच्या गायनाच्या कार्यक्रमाने झाली. पुढील दोन दिवस हा महोत्सव चालणार आहे.









