अर्थसंकल्प बैठकीत विकासकामे राबविण्यासाठी निधी मंजूर करण्याची मागणी : भटक्या कुत्र्यांच्या समस्येबाबत जोरदार चर्चा
बेळगाव : अर्थसंकल्प तयार करण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सूचना मांडण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र या बैठकीत शहराच्या विकासाऐवजी वॉर्डमधील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांचे गाऱ्हाणे नगरसेवकांनी मांडले. त्यामुळे अर्थसंकल्प तयारीची बैठक की, सर्वसाधारण सभा असा मुद्दा उपस्थित झाला. सातत्याने सूचना करूनही नगरसेवकांनी गटार, ड्रेनेज आणि पाणी समस्यांच्या तक्रारी केल्या. अर्थसंकल्प तयार करण्यासाठी नगरसेवकांच्या सूचना घेण्याकरिता सोमवारी सकाळी महापालिकेत बैठक आयोजित केली होती. यावेळी महापौर शोभा सोमनाचे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नगरसेवकांनी वॉर्डमधील समस्यांबाबत तक्रारी मांडण्यावर भर दिला. वास्तविक, अर्थसंकल्पात संपूर्ण शहराच्या विकासाच्यादृष्टीने तरतुदी करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने नगरसेवकांनी सूचना मांडणे गरजेचे आहे. पण नवनिर्वाचित नगरसेवकांची पहिलीच बैठक असल्याने नेमके कोणत्या विषयावर चर्चा करायची, हे लक्षात आले नाही. त्यामुळे प्रारंभी महापौरांनी आवाहन केल्यानंतर कोणीच सूचना मांडली नाही. अर्थसंकल्पाबाबत सूचना मांडाव्यात, असे सातत्याने महापौर व महापालिका आयुक्तांनी सांगितले. त्यानंतर नगरसेवकांनी वॉर्डमध्ये भेडसावणाऱ्या समस्यांची माहिती दिली. विशेषत: गटारी, डेनेज समस्या व पाणी समस्या भेडसावत आहे. या समस्यांचे निवारण करण्याची सूचना आयुक्तांकडे केली असता प्रत्येकवेळी निधी नसल्याचे आजपर्यंत आयुक्त रुद्रेश घाळी यांनी सांगितले. त्यामुळे शहरवासियांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निवारण करण्यासाठी निधीची तरतूद या बैठकीत करावी, अशी सूचना नगरसेवक रियाझ अहमद किल्लेदार, अजिम पटवेगार, रवी साळुंके, शाहीद पठाण यांनी मांडली.
पाणी समस्या निवारणासाठी ट ँकरची संख्या वाढवा
शहरात कुत्र्यांची समस्या भेडसावत असल्याने प्रथम या समस्येचे निवारण करावे, अशी सूचना नगरसेवक शंकर पाटील यांनी केली. तसेच भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात नागरिक जखमी होत आहेत. महापालिकेने केवळ नसबंदी उपक्रम राबविण्यासाठी निधीची तरतूद केली आहे. पण कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या रुग्णावर उपचार घेण्याच्यादृष्टीने कोणतीच तरतूद केली नाही. त्यामुळे कुत्र्यांच्या बंदोबस्तासह जखमींना उपचार घेण्यासाठी निधीची तरतूद अर्थसंकल्पात करावी, अशी सूचना शंकर पाटील यांनी केली. कुत्र्यांचा बंदोबस्त करणे आवश्यक असून उपाययोजना राबविण्याची मागणी नगरसेवक बाबाजान मतवाले तसेच इतर नगरसेवकांनी केली. त्यामुळे या बैठकीत प्रथम भटक्या कुत्र्यांच्या समस्येबाबत जोरदार चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे शहरातील पाणीसमस्येबाबत तक्रारी करण्यात आल्या. पाणी समस्या निवारणासाठी टँकरची संख्या वाढविण्याची मागणी करण्यात आली.
सभागृहात प्रोटोकॉल पायदळी तुडविण्याचा प्रकार
महापालिका सभागृह बैठकीत बोलण्यापूर्वी महापौरांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र महापौरांची परवानगी न घेताच सामान्य प्रशासन उपायुक्तांनी नगरसेवकांच्या तक्रारीचे उत्तर देण्याचा प्रयत्न सातत्याने केला. त्यामुळे अधिकाऱ्यांनादेखील सभागृहातील प्रोटोकॉलचे ज्ञान नसल्याचे सोमवारी झालेल्या बैठकीवेळी निदर्शनास आले. महापालिका सभागृहात 3 नगरसेवक वगळता उर्वरित नगरसेवक नवनिर्वाचित आहेत. सभागृहाचे प्रोटोकॉल नगरसेवकांना माहिती नाहीत. मात्र प्रोटोकॉलची माहिती मनपाच्या अधिकाऱ्यांनादेखील नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे प्रथम प्रोटोकॉलची माहिती नगरसेवक आणि अधिकाऱ्यांनी जाणून घेणे आवश्यक आहे. महापालिकेत नवनिर्वाचित नगरसेवकांसह बहुतांश अधिकारी नवीन आहेत. त्यामुळे सभागृहाचे नियम आणि प्रोटोकॉल पायदळी तुडविण्याचा प्रकार सुरू आहे. नगरसेवकांना सभागृहातील नियम व प्रोटोकॉलची माहिती देण्यासाठी विशेष बैठक आयोजित केली जाते. सभागृहातील कामकाज कसे चालते, तसेच स्थायी समितीच्या बैठकीतील चर्चा, विषयपत्रिका, इतिवृत्त, महापौर-उपमहापौर, नगरसेवकांचे अधिकार त्याचप्रमाणे स्थायी समितीचे अधिकार व स्थायी समिती अध्यक्ष आणि सदस्यांचे अधिकार याबाबत नगरसेवकांना माहिती देणे आवश्यक आहे. मात्र महापौर-उपमहापौर निवड झाल्यानंतर अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी नगरसेवकांची बैठक आयोजित केली होती. त्यामुळे नेमकी कोणती चर्चा करायची हे नगरसेवकांनादेखील कळले नाही.
दीडतासाच्या बैठकीत महापौर नि:शब्द!
बैठकीची सुऊवात महापौरांनी करणे आवश्यक आहे. मात्र एखाद्या सभेत प्रास्ताविक केल्याप्रमाणे सभेची सुऊवात प्रभारी कौन्सिल सेक्रेटरी भाग्यश्री हुग्गी यांनी केली. महापौरांची परवानगी न घेताच सातत्याने नगरसेवकांना सूचना करण्याचा प्रयत्न आणि नगरसेवकांच्या तक्रारीबाबत उत्तर देण्याचा प्रयत्न भाग्यश्री हुग्गी यांनी केला. वास्तविक पाहता महापौर हे सर्वोच्च असतात. नगरसेवक असो, अधिकारी किंवा आमदार या सर्वांनीच बैठकीत बोलण्यापूर्वी महापौरांची परवानगी घेणे, तसेच महापौरांच्या सूचनेनंतरच आपल्या सूचना मांडणे आवश्यक आहे. मात्र सोमवारी आयोजित बैठकीत महापौरांची परवानगी न घेताच बोलण्याचा प्रयत्न काहींनी केला. त्यामुळे सभागृहाचे प्रोटोकॉल पायदळी तुडविण्यात आल्याचे निदर्शनास आले. वेळोवेळी नगरसेवकांना सूचना करणे किंवा नगरसेवकांच्या प्रश्नांना उत्तर देणे आवश्यक आहे. पण प्रारंभी महापौरांनी सभेची सुऊवात केली. त्यानंतर थेट शेवट केला. दीडतास चाललेल्या बैठकीदरम्यान महापौरांनी एक शब्दही काढला नाही.
बैठकीतून पत्रकारांना बाहेर काढण्याचा प्रयत्न
महापालिकेच्या सर्वसाधारण बैठकीचे वृतांकन करता येत नाही, असे सांगत महापालिका आयुक्त रुद्रेश घाळी यांनी पत्रकारांना सभागृहातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र यापूर्वी आयोजित केलेल्या प्रत्येक बैठकीला पत्रकार उपस्थित असतं, असे सांगून बाहेर जाण्यास वृत्तपत्र माध्यम प्रतिनिधींनी नकार दिला. प्रत्येकवेळी पत्रकारांना बाहेर जाण्याची सूचना केली जात असल्याने आयुक्तांना धारेवर धरण्यात आले. बैठकीमध्ये होणाऱ्या निर्णयाची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कामकाज प्रसार माध्यमे करीत असतात. तसेच मनपाचे कामकाज पारदर्शी होण्याच्यादृष्टीने हे आवश्यक आहे. मात्र पत्रकारांना टाळण्याचा प्रयत्न महापालिका आयुक्त रुद्रेश घाळी आणि सामान्य प्रशासन उपायुक्त भाग्यश्री हुग्गी यांनी चालविला आहे. सोमवारी सकाळी महापालिका सभागृहात आयोजित बैठकीवेळीही पत्रकारांना बाहेर जाण्याची सूचना सामान्य प्रशासन उपायुक्त तथा प्रभारी कौन्सिल सेक्रेटरी भाग्यश्री हुग्गी यांनी केली. पत्रकारांनी याकडे दुर्लक्ष केल्याने त्यांच्या मदतीला महापालिका आयुक्त रुद्रेश घाळी धावून आले. बैठक झाल्यानंतर संपूर्ण माहिती देण्यात येईल, पत्रकारांनी सभागृहाबाहेर जावे, अशी सूचना केली. पण पत्रकारांनी नकार देऊन बैठकीला उपस्थित राहण्यास मज्जाव का केला जात आहे? असा मुद्दा उपस्थित केला. कुणाच्या सांगण्यावरून बैठकीतून पत्रकारांना बाहेर काढण्यात येत आहे, अशी विचारणा आयुक्तांकडे केली. यापूर्वी पत्रकारांना बैठकींना उपस्थित राहण्यास देण्यात येत नव्हते. त्यामुळे यापुढेदेखील पत्रकारांना बैठकीला वृतांकनासाठी उपस्थित राहता येणार नाही, असे रुद्रेश घाळी यांनी सांगितले.
य् ाापूर्वी बैठकीला पत्रकार नव्हते असे कोणी सांगितले, अशी विचारणा करीत सर्व पत्रकार आक्रमक झाले. प्रत्येकवेळी पत्रकारांना टाळण्याचा प्रकार सुरू आहे. नेमके काय गौडबंगाल आहे? असा मुद्दा उपस्थित करून आयुक्तांना धारेवर धरण्यात आले. महापालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत सामान्य नागरिकांच्या समस्यांबाबत चर्चा केली जाते. महापालिकेच्या कारभाराची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने प्रत्येक बैठकीचे वृत्तांकन यापूर्वी वृत्तपत्र माध्यमांनी केले आहे. महापालिकेतील प्रत्येक बैठकीला पत्रकार उपस्थित असतात. अधिकाऱ्यांना चुकीची माहिती देण्यात आली असून, बैठकीतून जाणार नाही, अशी भूमिका सर्व पत्रकारांनी घेतली. तसेच हवे असल्यास आमदार व अन्य अधिकाऱ्यांकडे विचारणा करा, असे आयुक्तांना सांगण्यात आले. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी आपला मोर्चा आपल्या आसनाकडे वळविला. य् ाापूर्वी अर्थसंकल्पाबाबत चर्चा करण्यासाठी सामाजिक संस्था आणि चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीलाही पत्रकारांना उपस्थित राहण्यास सामान्य प्रशासन उपायुक्त भाग्यश्री हुग्गी यांनी मज्जाव केला होता. तसेच महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यास आलेल्या नागरिकांचे छायाचित्र काढण्यासही महापालिका आयुक्त रुद्रेश घाळी यांनी आक्षेप घेतला होता. प्रत्येकवेळी पत्रकारांना टाळण्याचा प्रयत्न महापालिका आयुक्त आणि सामान्य प्रशासन उपायुक्त भाग्यश्री हुग्गी यांनी चालविला आहे. त्यामुळे पत्रकारांनी नाराजी व्यक्त केली. पत्रकारांना बैठकीला टाळाटाळ करण्यामागचे गौडबंगाल काय? असा मुद्दा उपस्थित केला.









