वृत्तसंस्था /बेंगळूर
लंकेमध्ये पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या 2023 आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या मोहिमेवर जाण्यापूर्वी येथील कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या संकुलामध्ये गुरुवारपासून भारतीय संघातील खेळाडूंसाठी सहा दिवसांच्या सराव प्रशिक्षण शिबिराला प्रारंभ झाला. या शिबिरामध्ये सलामीचा फलंदाज आणि यष्टीरक्षक के. एल. राहुलच्या फिटनेसवर अधिक लक्ष दिले जाईल. ऑक्टोबर, नोव्हेंबर दरम्यान भारतात होणाऱ्या 2023 च्या आयसीसीच्या विश्व चषक क्रिकेट स्पर्धेपूर्वी खेळाडूंची तंदुरूस्तता आणि विश्व चषक स्पर्धेच्या पूर्व तयारीबाबत विशेष लक्ष दिले जात आहे. संघातील खेळाडूंना व्यायाम करून घेणे महत्त्वाचे आहे. नुकत्याच विंडीज दौऱ्यावरून परतलेल्या भारतीय संघातील क्रिकेटपटूंमधील कांही उणीवावर या तंदुरूस्ती शिबिरात विशेष प्राधान्य दिले जाईल. कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या तीन विविध मैदानावर हे सराव शिबिर घेतले जात आहे. बेंगळूर, अलूर या ठिकाणी असलेल्या मैदानावर खेळाडूंना मार्गदर्शन केले जाणार आहे. या संपूर्ण सराव शिबिरात निवड समिती सदस्यांचे लक्ष प्रामुख्याने के. एल. राहुलच्या तंदुरूस्ती (फिटनेस) समस्येवर राहील.
आगामी आशिया चषक स्पर्धेसाठी घोषित करण्यात आलेल्या भारतीय संघात के. एल. राहुलची निवड केली आहे. पण त्याची तंदुरूस्ती समस्येचा आढावा घेऊनच निर्णय घेतला जाईल. आगामी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यात के. एल. राहुल खेळण्याची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात आले. निवड समिती प्रमुख अजित अगरकर के. एल. राहुलला स्पर्धेत खेळविण्यासाठी उत्सूक आहे पण तंदुरूस्ती समस्या तितकीच महत्त्वाची आहे. या सराव शिबिराच्या पहिल्या दिवशी संघातील बऱ्याच खेळाडूंना तंदुरूस्ती सत्रात मार्गदर्शन करण्यात आले. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा वैद्यकीय वर्ग उपस्थित होता. के. एल. राहुलने नेटमध्ये बराचवेळ फलंदाजीचा तसेच यष्टीरक्षणाचा सराव केला. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणारा श्रेयस अय्यर हा पूर्णपणे तंदुरूस्त असून तो आगामी स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. मध्यंतरी श्रेयस अय्यरला पाठदुखापतीची समस्या जाणवत असल्याने तो गेल्या मार्चपासून क्रिकेटपासून अलिप्त होता. भारतीय संघामध्ये अय्यरच्या पुनरागमनामुळे फलंदाजी अधिक भक्कम होण्यास मदत होईल. अय्यरने आतापर्यंत 20 डावात 47.35 धावांच्या सरासरीने 805 धावा जमविल्या असून त्यामध्ये 2 शतके आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे. भारतीय क्रिकेट संघ 30 ऑगस्ट रोजी बेंगळूरहून कोलंबोला प्रयाण करणार आहे. लंकेमध्ये होणाऱ्या 2023 च्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा सलामीचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानबरोबर 2 सप्टेंबर रोजी पल्लीकेल्ली येथे खेळविला जाणार आहे.









