प्रतिनिधी/ बेंगळूर
भाजपने राष्ट्रीय पातळीवर पक्षाच्या कमिटीची पुनर्रचना करून नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. तर काहींना वगळले आहे. कर्नाटकातील माजी आमदार सी. टी. रवी यांना पक्षाच्या मुख सचिवपदावरून हटविण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्यावर आता कर्नाटक भाजप प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याचे समजते. लवकरच याबाबतची घोषणा होण्याची शक्यता आहे.
राज्यातील विधानसभा निवडणूक होऊन अडीच महिने उलटले आहेत. काँग्रेसचे सरकार स्थापन होऊन विधिमंडळाचे अधिवेशनही पार पडले आहे. भाजपने अद्याप विधानसभेचा विरोधी पक्षनेताही निवडलेला नाही. दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष नलीनकुमार कटील यांच्या जागी दुसऱ्या नेत्याला बसविण्यासाठी चर्चा सुरू आहे. मात्र, यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. असे असताना आता सी. टी. रवी यांचे नाव पुढे आले आहे.
भाजपच्या कार्यकारिणीतून सी. टी. रवी यांना बाजूला करण्यामागे त्यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदी सोपविण्याचा हायकमांडचा विचार असल्याचे सांगण्यात आले आहे. आमदार सी. टी. रवी यांची 2020 मध्ये भाजपच्या राष्ट्रीय मुख्य सचिवपदी नेमणूक करण्यात आली होती. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीचा विचार करून हा बदल करण्यात येत असल्याचे समजते. शिवाय त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी देखील तिकीट मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
भाजपमध्ये ‘एक व्यक्ती, एक पद’ हा नियम असून सी. टी. रवींना प्रदेशाध्यक्षपदी नेमण्यासाठीच त्यांना पक्षाच्या राष्ट्रीय मुख्य सचिवपदावरून मुक्त करण्यात आल्याचे भाजपच्या सुत्रांनी सांगितले आहे. आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने रवी यांनी माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांची भेट घेतली होती. शिवाय मागील आठवड्यापासून त्यांना प्रदेशाध्यक्षपद मिळणार असल्याची चर्चा भाजप गोटात होती. या घडामोडींचा विचार केल्यास सी. टी. रवी यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी आणि आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी नेमणूक होण्याची दाट शक्यता आहे. विधानपरिषद विरोधी नेतेपदी कोटा श्रीनिवास पुजारी यांचे नाव निश्चित असल्याचे समजते.
यापूर्वी शोभा करंदलाजे यांचे नाव प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेत होते. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करंदलाजे यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून वगळण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांचे नाव बाजूला राहिले.









