आरोग्य स्थायी समिती बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना : घरोघरी जाऊन कचऱ्याची उचल करण्यावर भर, आवश्यक उपाययोजना कराव्यात
बेळगाव : गणेशोत्सव सुरू असल्याने शहर स्वच्छतेवर अधिक भर देण्यात यावा, कोठेही अस्वच्छता निर्माण होणार नाही. याची दक्षता घ्यावी. घरोघरी जाऊन घंटागाडीच्या माध्यमातून कचऱ्याची उचल केल्यास ब्लॅक स्पॉट निर्माण होणार नाहीत यासाठी अधिकाऱ्यांनी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी सूचना आरोग्य स्थायी समिती बैठकीत अधिकाऱ्यांना करण्यात आली. गणेशोत्सवानिमित्त मनपाच्या आरोग्य स्थायी समितीची तातडीची बैठक बुधवारी स्थायी समिती सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मी राठोड होत्या. बैठकीच्या सुरुवातीला साहाय्यक पर्यावरण अभियंता हणमंत कलादगी यांनी नवनिर्वाचित आरोग्य स्थायी समितीच्या अध्यक्षा लक्ष्मी राठोड यांच्यासह सदस्यांचे अभिनंदन करून स्वागत केले. त्यानंतर अध्यक्षानी उपस्थित अधिकाऱ्यांची ओळख करून घेतली.
यावेळी बोलताना अध्यक्षा राठोड म्हणाल्या, शहरातील सर्व 58 प्रभागांमध्ये स्वच्छतेचे काम कशा पद्धतीने सुरू आहे, याची माहिती देण्याची सूचना केली. शहर स्वच्छतेवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. शहर स्वच्छतेचा ठेका नवीन ठेकेदाराला देण्यात आला आहे. घरोघरी जाऊन कचऱ्याची उचल करण्यावर भर देण्यात आला असून यासाठी आणखी 14 अतिरिक्त वाहनांची गरज आहे. त्यामुळे लवकरच नवीन वाहने खरेदी केली जाणार आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. कचऱ्याच्या कंटेनरची उचल करण्यासाठी कंत्राटी पद्धतीवर लिफ्टर वाहन घेण्यात आले आहे, असे सांगण्यात आले. काही प्रभागांमध्ये सफाई कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. याबाबत स्वच्छता निरीक्षकांकडे विचारणा केली असता आपणाला कोणतीच कल्पना नसून मनपा आयुक्तांना विचारण्यात यावे, असे उत्तर दिले जात आहे. अशी तक्रार सदस्यांनी बैठकीत केली. यावर बोलताना साहाय्यक पर्यावरण अभियंता हणमंत कलादगी म्हणाले, गँगवाडीतील ऑनलाईन वेतन घेणारे सफाई कर्मचारी वारंवार गैरहजर राहत आहेत. त्यामुळे ही समस्या निर्माण होत आहे. अनेकवेळा त्यांना सूचना करूनही ते गैरहजर राहत आहेत.
गैरहजर सफाई कर्मचाऱ्यांना नोटीस
भविष्यात ही समस्या दूर केली जाईल, असे सांगितले. तसेच सदर सफाई कर्मचाऱ्यांना घरी जाऊन बोलवावे लागत आहे, अशी तक्रारही बैठकीत स्वच्छता निरीक्षकांनी केली. असे होत असल्यास जे सफाई कर्मचारी व्यवस्थित काम करत नाहीत किंवा गैरहजर राहत आहेत. त्यांना नोटीस बजावून समज द्यावी, अशी सूचना अध्यक्षा लक्ष्मी राठोड यांनी अधिकाऱ्यांना केली. यावेळी बैठकीला महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी, सदस्या वैशाली भातकांडे, नितीन जाधव यांच्यासह अन्य सदस्य व अधिकारी उपस्थित होते.
स्वच्छता निरीक्षकांचे बैठकीत अभिनंदन
महापौर मंगेश पवार यांनीदेखील घरोघरी कचरा गाडी पोहोचली पाहिजे, तसे झाल्यास ब्लॅक स्पॉट तयार होणार नाहीत. याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, शहरातील बहुतांश प्रभागांमध्ये स्वच्छता निरीक्षक चांगल्या पद्धतीने सेवा बजावत असल्याने त्यांचे बैठकीत अभिनंदन करण्यात आले.









