आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी गेल्या आठवड्यात आढावा बैठकांचा सपाटा लावला असून शिवसेना ठाकरे गट, भाजप आणि मनसेने काही उमेदवारांच्या नावाची संभाव्य यादी समोर आली आहे. भाजप लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची घोषणा करताना मोठ्या प्रमाणात धक्कातंत्राचा वापर करणार असून अनेकांचे पत्ते कट होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाकडे असलेल्या पाचही खासदारांच्या जागांवरही भाजपच आपला दावा सांगणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने मुंबईत सर्वच राजकीय पक्षांनी मतदार संघ निहाय आढावा बैठकांचा सपाटा लावला असून, भाजपच्या अनेक विद्यमान खासदारांना नारळ मिळण्याची शक्यता आहे. तर शिवसेना ठाकरे गटांनी राज्यसभेवर असलेल्या संजय राऊत, अनिल देसाई आणि प्रियांका चतुर्वेदी यांना लोकसभा निवडणुकीत उतरवण्याची तयारी सुरू केली असून त्या अनुषंगाने चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यात सत्तांतर झालेल्याला दीड वर्ष होत आले तरी भाजपकडे अद्यापही म्हणावे तसे जनमत नसल्याचे दिसत आहे.
अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना सोबत घेतले मात्र त्याचादेखील म्हणावा तसा फायदा सरकारला झालेला पहायला मिळत नाही. भाजपने लोकसभेसाठी 45 प्लस चा संकल्प करताना अनेक लोकसभा मतदार संघात पहिल्यांदा खासदारकीची निवडणूक लढवणारे चेहरे देण्याची रचना केली आहे. त्यामुळे काही प्रमाणात लोकांचा रोष कमी करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. त्याचाच भाग म्हणून की काय भाजपकडून अभिनेत्री माधुरी दीक्षित, प्रसिध्द
अॅडव्होकेट उज्वल निकम, पोलीस अधिकारी प्रताप दिघावकर हे भाजपकडून उमेदवार असू शकतात. शिवसेना ठाकरे गटातील 18 पैकी 13 खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला असून या सर्वांना आता भाजपसोबत जाण्याशिवाय गत्यंतर नसल्याचे दिसत आहे. कारण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे 45 प्लससाठी राज्यातील 48 लोकसभा मतदार संघात घर चलो अभियान करताना दिसत आहेत, मात्र या अभियानात केवळ भाजपचे पदाधिकारी सहभागी होताना दिसत आहेत. बोलताना महायुतीला 45 हून अधिक जागा मिळतील असे सांगत असले तरी अभियानात ना शिंदे गटाचे ना अजित पवार गटाचे पदाधिकारी दिसत आहे. केवळ भाजपचे केंद्रीय नेतृत्व राज्यात आले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपसोबत असतात.
भाजपने सध्या मुंबई महापालिका, विधानसभा तसेच लोकसभा या सर्व निवडणुकांच्या अनुषंगाने जोरदार कार्यक्रम बुथ पातळीपासून सुरू केले असून, प्रत्येक नेत्यावर तसेच पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करताना त्याचा आढावा घेण्याचे कामदेखील होताना दिसत आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वत:चे मुख्यमंत्री पद वाचिवण्यात तर अजित पवार हे मुख्यमंत्री पद मिळविण्याच्या प्रयत्नात अजून तरी दिसत आहेत. त्यात ठाकरे, शिंदे, मोठे आणि छोटे पवार या सर्वाच्या मागे सर्वोच्च न्यायालय आणि केंद्रीय निवडणूक आयोगाचे शुक्लकाष्ठ मागे असल्याने हे चारही पक्ष आणि त्याचे नेते सध्या याच प्रकियेत अडकलेले असताना, भाजप मात्र दुसरीकडे सर्व बाजुने जोरदार तयारी करताना दिसतआहे.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कधी नव्हे ते ठाकरे गटाने राज्यसभेत खासदार असलेल्यांना मैदानात उतरविण्याचे जाहीर केले आहे. 18 पैकी 13 खासदार ठाकरे यांना सोडून शिंदे गटात गेलेत, 5 खासदारांपैकी दक्षिण मुंबईतील अरविंद सावंत यांच्या जागेवर भाजपने मंत्री मंगलप्रभात लोढा किंवा विधानसभा अध्यक्ष अॅड.राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्याची तयारी सुरू केली आहे. ठाकरे गटाचे कोकणातील खासदार असलेल्या विनायक राऊत यांच्या जागेवर उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत आणि नारायण राणे यांचे चिरंजीव माजी खासदार निलेश राणे यांनी दावा केला असल्याने सध्या या जागेवर शिंदे गट आणि भाजपात धुसफुस होण्याची शक्यता आहे.
किरण सामंत यांनी काही दिवसापूर्वी ठाकरे गटाची निशाणी मशाल हे चिन्ह मोबाईल स्टेटसला ठेवून एकप्रकारे इशारा दिला आहे. पण गेल्या काही वर्षातील राजकारण बघता उमेदवार तोच असतो मात्र त्याचे निवडणूक चिन्ह बदलल्याचे बघायला मिळाले आहे. जसे की पालघरचे खासदार राजेंद्र गावित आणि साताऱ्यातून 2019 ला लोकसभेची निवडणूक लढविलेले शिवसेनेचे नरेंद्र पाटील हे उमेदवार जरी भाजपचे असले तरी ते शिवसेनेच्या चिन्हावर लढले होते. त्यामुळे किरण सामंत यांच्या स्टेटसला भविष्यात कमळ चिन्ह दिसले तरी नवल वाटता कामा नये कारण भाजप आता नवीन लोकांना संधी देणार असल्याने अनेकांना आतापासूनच धाकधूक लागली आहे. भाजपसोबतच शिवसेना ठाकरे गटाचे देखील राज्यसभेत खासदार राहिलेल्या अनिल देसाई, प्रियंका चतुर्वेदी आणि खासदार संजय राऊत हे लोकसभेच्या मैदानात दिसणार आहेत. तर मनसेनेदेखील आपल्या संभाव्य 10 उमेदवारांची यादी जाहीर करताना स्वबळावर लोकसभा निवडणूक लढण्याचे ठरवले आहे. मुंबईत मराठी माणसांना घर देण्यास झालेला विरोध तसेच मराठी पाट्या आणि पुन्हा एकदा टोलच्या मुद्यावऊन मनसे आक्रमक झाली असून मनसेला पुन्हा उभारी देण्यासाठी महाशक्ती पाठीशी असणार आहे कारण त्याचा फायदा अप्रत्यक्ष भाजपलाच होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रत्येक पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे.
पितृपक्षानंतर मोठ्या प्रमाणात पक्षांतर
लोकसभा आणि विधानसभा तसेच मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पितृपक्ष संपताच अनेक जण पक्षांतर करण्याची शक्यता आहे. शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला, त्यानंतर पेणचे माजी नगराध्यक्ष शिशीर धारकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. ठाकरे गटातील मुंबईतील अनेक नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश करण्याचा सपाटा लावलेला असून आत्तापर्यंत 35 नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्यांची संख्या ही कमी असली, तरी त्यात सरकारची साथ सोडून येणाऱ्यांचा विशेष समावेश नव्हता. मात्र मुंबईत आता उलटी गंगा वाहताना दिसत आहे. उत्तर मध्य मुंबईतील भाजपचे सचिव अॅड. सुधीर खातू यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसमवेत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. त्यामुळे यंदाच्या दसरा मेळाव्यात अनेक जण सीमोल्लंघन करतील अशी शक्यता आहे.
प्रवीण काळे








