वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय शेअर बाजारात सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी सुरुवात काहीशी नकारात्मक झाली. यात एफएमसीजी क्षेत्राच्या निर्देशांकाची कामगिरी घसरणीत राहिल्याने त्याचा परिणाम बाजारावर दिसला. या क्षेत्रातील गोदरेज कन्झ्युमरचा समभाग मोठ्या प्रमाणात घसरणीत राहिला.
सोमवारच्या सत्रात एफएमसीजी क्षेत्र चांगलेच चर्चेत राहिले. याने बाजाराला खाली खेचण्याचा प्रयत्न केला. सदरचा निर्देशांक सुरुवातीला 2 टक्के इतका घसरला होता. गोदरेज कन्झ्युमर प्रोडक्टसचा समभाग इंट्रा डे दरम्यान जवळपास 9 टक्के घटत 1120 रुपयांवर खाली आला होता. डिसेंबर तिमाहीतील कंपनीची कामगिरी खराब राहणार असल्याचा अंदाज व्यक्त झाल्यानंतर याचे परिणाम सदरच्या समभागावर साहजिकच दिसला.
काय आहे कारण
विक्रीत एकअंकीच वाढ राहणार असून साबणाच्या वाढलेल्या किमती, अवकाळी पाऊस व विक्रीत घसरण यामुळे तिमाही नफ्यावर परिणाम होणार असल्याचा अंदाज सोमवारी गोदरेजकडून व्यक्त करण्यात आला. याअंदाजाने बाजाराला खाली खेचलेच सोबत या क्षेत्रातील इतर कंपन्यांचा कलही नकारात्मकतेकडे झुकला.
या समभागांवरही दबाव
निफ्टी एफएमसीजी निर्देशांकावरच याने परिणाम जाणवला व सकाळी 2 टक्के घसरत 56,516 अंकांवर घसरला होता. यापाठोपाठ हिंदुस्थान युनिलिव्हर 4 टक्के, डाबर, मॅरिको, कोलगेट पामोलीव्ह यांचे समभाग 2 टक्के आणि ब्रिटानिया, टाटा कन्झ्युमर यांचे समभाग 1 टक्का इतके घसरलेले दिसले.









