सेन्सेक्स 200 अंकांनी घसरणीत : रिलायन्स नुकसानीत
वृत्तसंस्था/ मुंबई
जागतिक बाजार मजबुत असतानाही सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअर बाजार नकारात्मक स्थितीत बंद झाला. एफएमसीजी निर्देशांकाच्या कामगिरीचा परिणाम बाजारावर राहिला होता. सेन्सेक्स 200 अंकांनी घसरणीत होता.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 200 अंकांच्या घसरणीसाब्sात 81,508 वर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 58 अंकांनी घसरत 24619 अंकांवर बंद झाला. ऑटो, एफएमसीजी क्षेत्रातील समभागांमध्ये विक्रीचा दबाव दिसून आला. दुसऱ्या सत्रात रिलायन्स इंडस्ट्रिजचे समभागही घसरलेले होते. पहिल्या सत्रात सेन्सेक्समध्ये 100 अंकांची घसरण होती पण दुसऱ्या सत्रात पुन्हा 100 अंकांनी बाजार खाली सरकला. सेन्सेक्समधील 30 पैकी 17 समभाग घसरणीत होते तर 13 समभाग मात्र तेजीसह बंद झाले. तर निफ्टीत 50 पैकी 30 समभाग नुकसानीसह बंद झाले तर 19 समभाग नफ्यासह बंद झाले.
हे समभाग घसरणीत
सेन्सेक्समधील 30 पैकी हिंदुस्थान युनिलिव्हरचे समभाग 3 टक्के इतके घसरणीत होते. तर टाटा मोटर्स, अॅक्सिस बँक, नेस्ले इंडिया, एशियन पेंटस्, आयटीसी, रिलायन्स इंडस्ट्रिज, महिंद्रा आणि महिंद्रा, स्टेट बँक यांचे समभाग मोठ्या प्रमाणात घसरणीत राहिले होते. यासोबत बजाज ऑटो, ओएनजीसी, टेक महिंद्रा, कोल इंडिया, आयशर मोटर्स, अपोलो हॉस्पिटल, मारुती सुझुकी, अल्ट्राटेक सिमेंट, ट्रेंट यांचेही समभाग नुकसानीसह बंद झाले होते.
हे समभाग तेजीत
तर दुसरीकडे एल अँड टीचे समभाग 2 टक्के इतके तेजीत होते. टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील, एचडीएफसी बँक, अदानी पोर्टस्, कोटक बँक, विप्रो, इन्फोसिस,बजाज फायनान्स, एनटीपीसी, बीपीसीएल, हिंडाल्को, सनफार्मा, भारती एअरटेल यांचे समभागही तेजीसोबत बंद झाले होते. अमेरिकेतील ग्राहक किमत निर्देशांक (सीपीआय) डाटा सादर होणार असून याचा दबाव बाजारात दिसला. सध्याला गुंतवणूकदार एकुणच सावधगिरीची भूमिका घेत आहेत.
गेल्या पाच सत्रात भारतीय शेअर बाजारात चांगली तेजी अनुभवायला मिळाली आहे. आशियाई बाजारात जपानचा निक्केई तेजीत होता तर कोरीयाचा कोस्पी घसरणीत होता. चीनचा शांघाय कम्पोझीट घसरणीसोबत बंद झाला.









