तिसरे रेल्वेफाटक वाहतुकीस बंद : पाया खोदाई करून कॉलम उभारणी सुरू, केवळ उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू
बेळगाव : शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या रेल्वेमार्गावर मुख्य रस्त्याच्या ठिकाणी उड्डाणपुलाची उभारणी करण्यात येत आहे. या अंतर्गत तिसऱ्या रेल्वेफाटकावरील एका बाजूचा उड्डाणपूल पूर्ण झाला आहे. अलीकडेच दुसऱ्या बाजूच्या उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम युद्धपातळीवर सुरू असून फाटकावरून ये-जा करणारी वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. रेल्वे उड्डाणपूल खुले करण्यात आल्याने उड्डाणपुलावरूनच वाहनधारकांची ये-जा सुरू आहे. खानापूर रोड 120 फुटाचा असल्याने बसवेश्वर चौकाकडून उद्यमबागकडे ये-जा करणाऱ्या वाहनाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तिसऱ्या रेल्वेफाटकावर सध्या उड्डाणपुलाची उभारणी केली असली तरी वाहनांची संख्या पाहता या उड्डाणपुलावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जाण्यासाठी वेगळा आणि येण्यासाठी वेगळा उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्ताव रेल्वेखात्याने तयार केला होता. त्यानुसार एका बाजुच्या उड्डाणपुलाचे काम पूर्ण करून वाहतुकीस खुला करण्यात आला आहे. सध्या या रेल्वे उड्डाणपुलावरून दोन्ही बाजूची वाहतूक सुरू आहे. मात्र दुसऱ्या बाजुच्या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर एकेरी वाहतूक सुरू केली जाणार आहे. दुसऱ्या बाजूच्या उड्डाणपुलाचे काम 15 दिवसांपूर्वी सुरू करण्यात आले आहे. उड्डाणपुलाचे पिलर उभारण्यासाठी पाया खोदाई करण्यात येत आहे. ड्रिलिंग मशिनद्वारा पाया खोदाई करून कॉलम उभारणी सुरू आहे. त्यामुळे दुसऱ्या बाजूचा रस्ता वाहतुकीस पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे. सध्या तिसरा रेल्वेगेट बंद ठेवण्यात आला असून उड्डाणपुलाची उभारणी झाल्यानंतर हा फाटक कायमस्वरुपी बंद राहणार आहे. या रस्त्यावर सध्या उड्डाण पुलाच्या उभारणीचे साहित्य ठेवण्यात आले आहे. वाहनांना केवळ उड्डाणपुलावरून ये-जा करण्याची मुभा आहे. उड्डाणपुलाखाली रेल्वेफाटक पसिरात एका बाजूने सर्व्हिस रस्ता सुरू आहे. तर दुसऱ्या बाजूला पायाखोदाई, उड्डाणपुलाच्या उभारणीचे साहित्य पसरले असल्याने वाहनधारकांनादेखील आणि स्थानिक व्यावसायिकांना अडचणीचे ठरत आहे.









