कराड :
युनिक म्हणवल्या जाणाऱ्या नव्या उड्डाणपुलाचे कराड, मलकापूर, नांदलापूर परिसरात काम वेगाने सुरू आहे. शनिवारी सायंकाळी कोल्हापूर नाक्यावर सिगमेंट उचलताना ओली जमीन अरल्याने तो अचानक निसटला. या घटनेत सिगमेंट उचलताना जे दोन कर्मचारी सिगमेंटवर उभे असतात, ते खाली पडून जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, कराडला सहापदरीकण अंतर्गत नव्या उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. हे काम अंतिम टप्प्यात असून ते पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान, शनिवारी सायंकाळी कोल्हापूर नाक्यावरील पिलरवर सिगमेंट बसवण्याचे काम सुरू होते. सिगमेंट घेऊन येणारे वाहन हे उड्डाणपुलाच्या खाली आले. तंत्रज्ञानाच्या आधारे तब्बल 140 किलो वजनाचा सिगमेंट वाहनातून उतरून जमिनीवर लाकडी; पण मजबूत ठोकळ्यांवर ठेवण्यात आला. काही वेळातच तो उचलण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यासाठी मशनरींच्या सहाय्याने सिगमेंटला सुरक्षित असे बांधण्यात आले. सिगमेंट उचलताना त्यावर दोन कर्मचारी हे लाईन अन् लेन्थ सांगण्यासाठी उभे असतात. मात्र हा सिगमेंट एका बाजूला जमिनीत रुतल्याने तो तिरका झाला. त्यामुळे एका बाजूला कलल्याने सिगमेंटचा भार एकाच बाजूला गेला अन् तो उचलण्यासाठी वापरण्यात येणारी यंत्रणा तुटली. त्यामुळे सिगमेंट काही अंतरावर जाऊन खाली जमिनीवर आदळला. या घटनेत चार कर्मचारी जखमी झाले.
या घटनेची माहिती समजताच डी. पी. जैन कंपनीचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार, वाहतूक शाखेचे संदीप सूर्यवंशी यांच्यासह पोलिसांनी धाव घेतली. हा प्रकार नेमका कशामुळे घडला याची सखोल चौकशी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या प्रकाराने वाहतूक कोंडी होऊन वाहतूक विस्कळीत झाली होती.








