कोल्हापूर :
कोल्हापूर शहरातील तावडे हॉटेल ते शिवाजी पूल उड्डाणपूल, सातारा-कागल हायवे एनएच 48 (जुना एनएच 4) रोडवरील उड्डाण पूल, केर्ली-शिवाजी पूल, सांगली फाटा ते उचगाव मार्गावरील उड्डाणपूल असे चार उड्डानपूलास मंजूरी मिळण्यासाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविला असल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली. शासनाकडून या पुलासाठी आवश्यक असणाऱ्या निधीची तरतूद व्हावी, या उद्देशाने हे प्रस्ताव पाठविल्याचेही त्यांनी सांगितले.
मुंबई, पुण्याच्या धर्तीवर आता कोल्हापूरसह कागल येथे चार उड्डाणपूल उभारण्यात येत आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून याचे डीपीआर करण्याचे काम अंतिम टप्प्यावर आहे. पुढील दोन वर्षात ही कामे पूर्ण करण्याचे नियोजन आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये 26 मे रोजी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार शाहू छत्रपती, आमदार अमल महाडिक, आमदार अशोकराव माने यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये यासंदर्भात बैठक झाली होती.
यावेळी प्रस्तावित सातारा-कागल हायवे एनएच 48 (जुना एन एच 4) रोडवरील उड्डाणपूल, सातारा-कागल महामार्गाचे काम, सांगली फाटा ते उचगाव मार्गावर होणाऱ्या उड्डाणपुलाचा डीपीआर तसेच तावडे हॉटेल ते शिवाजी पूल उड्डाण पूल, केर्ली ते शिवाजी पूल या उड्डाणपूलाचे सादरीकरण केले होते. यावेळी शिरोली पुलाच्या येथे अगोदरच मंजूर असलेल्या बास्केट बास्केट ब्रिजला जोडूनच तावडे हॉटेल ते शिवाजी पूल या उड्डाणपुलाची उभारणी करावी, अशी सूचना करण्यात आली होती. तसेच तावडे हॉटेल ते शिवाजी पूल हा उड्डाणपूल इलेव्हेटेड पद्धतीने उभारण्यात येणार असून यासाठीचा तांत्रिक आराखडा या बैठकीत सादर करण्यात आला होता. यावेळी लोकप्रतिनिधींनी सूचना काही महत्वपूर्ण सूचनाही केल्या. यानुसार चारही उड्डानपूलाचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. हे सर्व प्रस्ताव मंजूर होवून बजेटमध्ये निधीची तरतूद व्हावी, यासाठी केंद्र शासनाकडे पाठविण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी येडगे यांनी सांगितले.
- परिख उड्डाणपुलाचाही समावेश
जिल्हाधिकारी कार्यालयात 26 मे रोजी सादरीकरणावेळी परिख पूल येथील प्रश्न मार्गी लावण्यासाठी तावडे हॉटेल चौक ते शिवाजी पुलाच्या उड्डाणपूलाला दाभोळकर कॉर्नर येथे मध्यवर्ती बस स्थानकापासून रेल्वे ओव्हर ब्रिज करून पाच बंगला परिसराशी जोडण्यात यावे, अशी सूचना आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली होती. आमदार अमल महाडिक यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीत हा मार्ग येत नसला तरी खास बाब म्हणून आम्ही सर्व लोकप्रतिनिधी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पत्र देऊ, असे सांगितले होते. याचाही समावेश पाठविलेल्या प्रस्तावात करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली.
- निधी मिळण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करणे आवश्यक
शहरासह जिल्ह्यात वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे. यावर पर्याय म्हणजे उड्डाणपूल आहे. तावडे हॉटेल ते शिवाजी पूल हा उड्डाणपूलची चर्चा गेले 10 वर्षापासून सुरू आहे. आमदार अमोल महाडिक यासाठी सतत पाठपुरावा करत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी चार उड्डाडगपुलाचे प्रस्ताव केंद्र शासनाकडे मंजूरीसाठी पाठविले आहेत. पेंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यासाठी सकारात्मक आहेत. या उड्डणापुलांचा चेंडू आता केंद्र शासनाकडे आहे. भरीव निधी मिळण्यासाठी कोल्हापुरातील लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करणे आवश्यक आहे.
- सुमारे 3 हजार कोटींची गरज
कागल, उचगांव फाटा, तावडे हॉटेल-शिवाजी पूल, केर्ली-शिवाजी पूल या चार उड्डाणपुलासाठी सुमारे 3 हजार कोटी लागणार असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यामध्ये कागल येथील उड्डाणपुलासाठी 600 कोटी, उचगांव फाटा 980 कोटींची निधी प्रस्तावित आहे. याचबरोबर तावडे हॉटेल-शिवाजी पूल, केर्ली-शिवाजी पुलासाठी सुमारे 1500 कोटी लागू शकतात.








