तिसरे रेल्वे फाटक वाहतुकीस बंद : यंत्रोपकरणाद्वारे पिलर उभारणीसाठी पायाखोदाईचे काम सुरू
प्रतिनिधी / बेळगाव
चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर तिसऱ्या फाटकावरील उड्डाणपूल वाहतुकीस खुला झाला आहे. आता त्यापाठोपाठ बाजूला आणखी एका उड्डाणपुलाची उभारणी केली जाणार असून या कामास शुक्रवारपासून प्रारंभ करण्यात आला. गुरुवारपासून तिसरा रेल्वे फाटक वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. त्यामुळे आता शहरात प्रवेश करणाऱ्या वाहनधारकांना उड्डाणपुलावरून किंवा काँग्रेस रोडचा उपयोग करावा लागणार आहे.
तिसऱ्या रेल्वे फाटकावर दुतर्फा वाहतुकीसाठी उड्डाणपुलाची उभारणी करण्यासाठीचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. यापैकी पहिल्या टप्प्यात एका बाजूचा पूल आणि दुसऱ्या टप्प्यात दुसऱ्या बाजूच्या पुलाची उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार पहिल्या टप्प्यात उड्डाणपुलाची उभारणी सुरू करण्यात आली होती. 2018 मध्ये उड्डाणपुलाच्या उभारणीस प्रारंभ करण्यात आला. मात्र लागलीच कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने पुलाचे काम करण्यास अडचण निर्माण झाली होती. परराज्यातील कामगार उड्डाणपुलाचे काम करण्यासाठी आले होते. मात्र कोरोनाच्या प्रसारामुळे कामगार आपल्या गावी परतले. परिणामी उड्डाणपुलाच्या उभारणीच्या कामात अडचण निर्माण झाली. तब्बल दोन वर्षांनंतर उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले असून अलीकडेच हा उड्डाणपूल वाहतुकीस खुला करण्यात आला.
कोणताच गाजावाजा न करता थेट काम सुरू
आता दुसऱ्या बाजूच्या उड्डाणपुलाच्या उभारणीचे काम सुरू करण्यात आले असून निवडणुकीच्या तोंडावर साहित्याची जमवाजमव करण्यात आली आहे. उड्डाणपुलाच्या उभारणीबाबत कोणताच गाजावाजा करण्यात आला नाही. भूमिपूजन किंवा उद्घाटनाचा कार्यक्रम करण्यापूर्वीच थेट काम सुरू करण्यात आले आहे. उड्डाणपुलाच्या उभारणीसाठी महिन्यापूर्वी सर्व साहित्य दाखल झाले आहे. सदर कंत्राटदाराने शुक्रवारपासून उड्डाणपुलाच्या उभारणीस प्रारंभ केला आहे. याकरिता तिसऱ्या रेल्वे फाटकावरील दुसऱ्या बाजूचा रस्ता आता बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे अनगोळ नाक्यापासून तिसऱ्या रेल्वेगेटकडे जाणाऱ्या रस्त्यावरून वाहनधारकांना ये-जा करता येणार नाही. या रस्त्यावर पायाखोदाईचे काम सुरू करण्यात आले आहे. यंत्रोपकरणाद्वारे पिलर उभारणीसाठी पायाखोदाईचे काम करण्यात येत आहे. त्यामुळे आता वाहनधारकांना ये-जा करण्यासाठी उड्डाणपूल अथवा काँग्रेस रोडचा वापर करावा लागणार आहे. या उड्डाणपुलाच्या उभारणीनंतर तिसरे रेल्वेफाटक वाहतुकीसाठी कायमस्वरुपी बंद राहण्याची शक्यता आहे.