रत्नागिरी :
सागरी महामार्गावरील रत्नागिरी नजीकच्या मिऱ्या ते काळबादेवी पुलाला जोडून उड्डाण पूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. हा पूल थेट नवानगर पाथरदेव आणि बसणीतून थेट आरेवारेला जोडण्यात येणार आहे. याबाबत आठ दिवसात जागेची अंतिम मोजणी करण्यात येणार आहे. मात्र पुलासाठी वन खात्याने येथील सुरू बन तोडण्यास नकार दिल्याचे समजते.
रत्नागिरीतील काळबादेवी येथून जाणाऱ्या प्रस्तावित सागरी महामार्गाबाबत महत्वपूर्ण बैठक रविवारी पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीला एमएसआरडीसीचे अधिकारी आणि काळबादेवी येथील ग्रामस्थ उपस्थित होते. सागरी महामार्ग समुद्राजवळून जावा अशी येथील स्थानिक ग्रामस्थांची मागणी होती. ग्रामस्थांच्या आक्रमक पाठपुराव्यामुळे समुद्रमार्गे सागरी महामार्ग होण्यासाठी एमएसआरडीसी मार्फत सर्वेक्षण देखील करण्यात आले. मात्र या मार्गावर असलेल्या वन खात्याच्या सुरुबनामुळे समुद्र मार्गे सागरी महामार्ग नेण्यावर बंधने आली.
- काळबादेवीतील एकाही घराला धक्का नाही
उड्डाण पूल उभारताना काळबादेवी येथील एकाही घराला धक्का लागणार नाही याची काळजी घेतली जाईल, असे एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी या बैठकीत ग्रामस्थांना सांगितले. समुद्रामार्गे हा पूल न नेता थेट नवानगर पाथरदेव येथे मुख्य मार्गाला जोडण्यात येणार आहे. सध्याच्या रत्नागिरी -गणपतीपुळे मार्गावरील बसणी रस्त्याला हा सागरी महामार्ग जोडण्यात येणार आहे. त्यासाठी पुढील आठ दिवसात बसणी मार्गे जाणाऱ्या सागरी महामार्गासाठी अंतिम जागा निश्चिती करण्यात येणार असल्याची माहिती बैठकीला उपस्थित अधिकाऱ्यांनी दिली.








