आमदार राजेश फळदेसाई यांची माहिती : कोकण रेल्वे-गोवा सरकार करणार प्रत्येकी 50 टक्के खर्च

पणजी; गवंडाळी रेल्वे ओव्हर क्रॉसिंगवर उ•ाणपूल उभारण्यासाठी कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई यांनी पुढाकार घेतला आहे. या पुलासाठी पायाभरणी झाल्यानंतर तो एका वर्षभरात बांधून पूर्ण केला जाईल, अशी माहिती आमदार फळदेसाई यांनी दिली. कुंभारजुवे व माशेल येथे जाण्यासाठी गवंडाळी येथे पूल उभारण्यात आल्यापासून वाळपई, सांखळी, आमोणा, माशेल तसेच बेळगावहून येणारी बरीच वाहतूक गवंडाळी पुलावरून सुरू झाल्याने माशेल ते जुने गोवे या दरम्यानच्या मार्गावर सकाळ-संध्याकाळ वाहतुकीचा प्रचंड ताण असतो. मात्र करमळी रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी थिवीहून निघणाऱ्या रेलगाड्या ज्या मार्गावरून निघतात तो रेलमार्ग गवंडाळी-जुने गोवे धावजी येथून जातो. त्यामुळे रेलगाडी करमळी किंवा थिवीवरून निघताच दोन्ही बाजूने फाटक लावून घेतले जाते. यातून गवंडाळी पुलावरून येणारी हजारो वाहने पणजीकडे निघणारी वाहने अडकून पडतात.
दररोजचीच ही डोकेदुखी झालेली आहे. अनेकवेळा रेल्वे फटकापासून गवंडाळी पुलापर्यंत वाहने रांगेत उभी असतात व सकाळच्या प्रहरी वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण होते. यातून खरा फटका बसतो तो सरकारी कर्मचाऱ्यांना. कैकवेळा 15 मिनिटे रांगेत थांबून जेव्हा गाडी फाटकाजवळ पोहोचते तेव्हा दुसऱ्यांदा फाटक पडते. त्यामुळे वाहनचालकांचा अर्धा तास वाया जातो व कर्मचारी सकाळी उशिरा कामावर पोहोचतात. अत्यवस्थ रुग्ण असला तर समस्या निर्माण होते. त्यामुळेच स्थानिक आमदार राजेश फळदेसाई सातत्याने गेले वर्षभर रेल्वे ओव्हरब्रीजसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करीत आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अखेर दखल घेतली आणि धावजी-जुने गोवे येथे रेल्वे ओव्हरब्रीजला मान्यता दिली. या संदर्भात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व आमदार राजेश फळदेसाई यांनी कोकण रेल्वेच्या चेअरमनशीही बोलणी केली. ही बोलणी यशस्वी झालेली आहे व त्यामुळे या रेल्वे उ•ाणपुलाच काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला. गोवा सरकार या कामी 50 टक्के खर्च करील व कोकण रेल्वे महामंडळ उर्वरित 50 टक्के खर्च करणार आहे. आमदार राजेश फळदेसाई यांनी सांगितले की फ्लायओव्हर उभारण्यासाठी आजूबाजूची थोडी जमीन लागणार असल्याने आपण तेथील जमीन मालकांशी बोलणी सुरू केली आहे. जिल्हाधिकारी उत्तर गोवा यांनी सर्वेक्षणाचे आदेश दिलेले होते. त्यानुसार सर्वेक्षण पूर्ण झालेले आहे. आता जमीन मालकांशी वाटाघाटी करून त्यांचे प्रश्न सोडविल्यानंतर लागलीच पायाभरणी केली जाईल. आपल्याला हा पूल 2024 मध्ये पूर्ण करण्याची इच्छा आहे, असे आमदार फळदेसाई म्हणाले. आपण त्यासाठी दररोज आढावा घेत आहे, असे ते म्हणाले.









