जगावेगळ्या साधनांची निर्मिती करण्यासाठी चीनच्या तंत्रज्ञांची मोठी प्रसिद्धी आहे. भविष्य काळात जगात वीजेची टंचाई निर्माण होणार असून तिच्यावर मात करणे हे माणसासमोरचे सर्वात मोठे आव्हान होणार आहे. त्यावर तोडगा म्हणून चीनच्या तंत्रज्ञांनी उडते वीजनिर्मिती केंद्र निर्माण केले आहे. या सयंत्रात चक्क हवेपासून वीजनिर्मिती केली जाते, असे प्रतिपादन केले गेले आहे.
चीनच्या शिनजियांग प्रांतात या उपकरणाचे नुकतेच हवेत 1 हजार मीटर उंचीवर परीक्षण करण्यात आले आहे. ते यशस्वी झाल्याचा दावा करण्यात येत आहे. या उंचीवर वाऱ्याचा वेग अधिक असतो. त्यामुळे वाऱ्यामुळे या सयंत्रातील टबॉईन फिरु लागते. त्यातून मग वीजनिर्मिती होण्यास प्रारंभ होतो. हे सयंत्र उडणारे असल्याने जेथे वाऱ्याचा वेग अधिक, तेथे ते उडत जाऊ शकते. त्यामुळे या सयंत्रातून अखंड वीजनिर्मिती होत राहते, असेही संशोधकांचे म्हणणे आहे. हे सयंत्र 30 टक्के वीजेची बचत करते, असेही परीक्षणातून दिसून आले आहे.
दुर्गम भागातील लोकवस्त्यांना, तसेच लहान उद्योगांनाही वीजपुरवठा करणे या सयंत्रामुळे शक्य होणार आहे. चीनने 2030 पर्यंत मोठ्या प्रमाणात पवनऊर्जा निर्मिती करण्याचे ध्येय बाळगले आहे. या प्रयत्नाचा एक भाग म्हणून या सयंत्राकडे पाहिले जात आहे, उंचीवर पवन ऊर्जा निर्मिती केंद्राची स्थापना करणे शक्य झाल्यास मोठ्या प्रमाणावर वीजनिर्मिती करता येणे शक्य आहे. प्रारंभीच्या या यशामुळे चीनी संशोधकांनी समाधान व्यक्त केले असून आणखी प्रयोग करण्याची त्यांची योजना आहे. येत्या तीन ते चार वर्षांमध्ये अशा प्रकारच्या सयंत्रांमधून वीजनिर्मिती मोठ्या प्रमाणावर करता येणार आहे. हे संयंत्र पर्यावरणस्नेही असल्याने त्याच्या उपयोगातून वायूप्रदूषण होणार नाही. तसेच प्रारंभी अधिक गुंतवणूक करावी लागली, तरी नंतरच्या काळात वीज जवळपास विनामूल्य उपलब्ध होणार असल्याने हा प्रकल्प आर्थिकदृष्ट्याही अत्यंत लाभदायक ठरेल, असा विश्वास संशोधकांनी व्यक्त केला आहे. अद्याप, हे प्रयोग बाल्यावस्थेत असले तरी, लवकरच ते व्यापारी तत्वावर वीजनिर्मिती करण्यात यशस्वी ठरणार आहेत. अपेक्षित काळात हे सयंत्र कार्यरत झाल्यास जगभर मोठ्या प्रमाणात स्वच्छ ऊर्जानिर्मितीचे निर्माणकार्य होऊ शकेल, असा विश्वास संशोधकांनी व्यक्त केलेला आहे.









