ऑनलाईन टीम/तरुण भारत
पुणे शहरात सर्वात मोठी कोणती समस्या असेल तर ती म्हणजे वाहतुकीची. यासंदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) यांची आज पुणे (Pune) येथील महामार्ग आणि मनपा अधिकारी यांच्याशी चर्चा झाली. यावेळी पुण्याच्या याच वाहतुकीच्या समस्येवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक आगळावेगळा असा उपाय सांगतिला आहे. पुण्यात उडत्या बसेसची योजना आणल्यास वाहतुकीची समस्या कमी होईल असं त्यांनी म्हटलं. आज गडकरी यांनी चांदणी चौकातील वाहतूक समस्या आणि इतर मुद्द्यांवर पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी नव्या काही योजनांवर काम सुरु असल्याची माहिती दिली.
पुणेशहरामधून अनेक राज्यातील अनेक शहरांमध्ये मार्ग जातात. त्या मार्गात कोणते बदल केले जातील या संदर्भांत नितीन गडकरी यांनी माहिती दिली. शहर नियोजनानुसार या सगळ्या मार्गाची सुयोग्य रचना होणार आहे. पुणे-शिरुर नगर- औरंगाबाद रस्त्यात तीन मजली उड्डाणपुल सुद्धा होणार असल्याची घोषणा गडकरी यांनी केली. त्याचबरोबर पुण्यातील चांदणी चौकातील पूल पुढील दोन-तीन दिवसात पाडणार आहेत आणि त्यासाठी नवं कामदेखील लवकरच सुरु होणार असल्याचंही गडकरी म्हणाले. जर का हे काम लवकर सुरु झाले तर येत्या जून मध्ये नव्या पुलाचं उद्घाटन करण्यात येईल. असंही गडकरींनी स्पष्ट केलं. पुण्यातील(pune traffic problem) वाहतूक कोंडीचा प्रश्न लक्षात घेऊन जमिनीपासून १०० फूट उंचीवरून उडणाऱ्या बसेसची योजना जाहीर केली आहे. त्यासाठी निधी सुद्धा देण्यात येईल. या सगळ्यात लोकप्रतिनिधींचा सहभाग महत्वाचा असेल असंही ते म्हणाले.
नितीन गडकरी यांनी सांगितलं की “पुण्यातील सातारा रोडवर वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी चार मजली रस्त्यांची योजना राबवण्यात येणार आहे. यासाठी सातारा रोडवर एलिव्हेटेड रोड बांधण्याचा प्लॅन आहे. म्हणजे खाली रस्ता, त्यानंतर दोन उड्डाणपूल आणि त्याच्यावर मेट्रोसारखी मास रॅपिड ट्रान्सपोर्टची व्यवस्था असेल. यासंदर्भात अभ्यास करायला मी सांगितलं आहे.”
दरम्यान, पुण्यातील काही दुष्काळी भागातुन ते त्यांच्या पुढील कामासाठी जाणार आहेत आणि त्याच दुष्काळी भागाचा विकास होण्यासाठी हायवेची निर्मिती होणार आहे. हायवेच्या निर्मितीने दुष्काळी भागाचा विकास होण्यासाठी मदत होणार आहे. आणि या हायवेची अलाईनमेंट झाली आहे. त्याच बरोबर पुणे – औरंगाबादची सुद्धा अलाईनमेंट झाली आहे. असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.