पणजी : राज्यात गेल्या काही दिवसांपासून भाज्यांच्या दरात सातत्याने चढउतार सुरु आहेत. त्यामुळे सामान्य ग्राहकांचे घरगुती बजेट कोलमडले आहे. कांदा, बटाटा, टोमॅटो यांसारख्या दैनंदिन वापराच्या भाज्यांच्या किंमतीत वारंवार होणाऱ्या बदलामुळे बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून कांदा, बटाटा आणि टोमॅटोच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात फरक पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी प्रतिकिलो 50 रुपये असलेले हे दर कधी 30 तर कधी 40 रुपयांवर घसरले. सध्या मात्र हे दर पुन्हा वाढले असून, आकारानुसार कांदा, बटाटा व टोमॅटो हे 40 ते 50 रुपये प्रतिकिलो दराने विकले जात आहेत.
फलोत्पादन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कांद्याचा घाऊक दर 26 रुपये, बटाट्याचा 30 रुपये तर टोमॅटोचा 30 रुपये प्रति किलो इतका आहे. तथापि, किरकोळ बाजारात दर त्यापेक्षा अधिक असून, या रविवारी विशेषत: टोमॅटोच्या दरात वाढ झाली आहे. भाज्यांबरोबरच इतर वस्तूंचेही दर वाढले आहेत. फलोत्पादन बाजारात भेंडी 63 रुपये किलो, गाजर 59 रुपये, बीट 65 रुपये, आले 105 रुपये, लसूण 150 रुपये, वालपापडी 74 रुपये, मिरची 43 रुपये, कारली 60 रुपये तर ढब्बू मिरची 80 रुपये किलो मिळत आहे. दरम्यान, स्थानिक बाजारात हेच दर अधिक असल्याचे दिसून येते.
मिरची 100 ते 120 रुपये किलो, वालपापडी 90 रुपये किलो, भेंडी, कारली व ढब्बू मिरची 60 ते 80 रुपये किलो दराने विकली जात आहे. कोबी व फ्लॉवर प्रत्येकी 40 रुपये नग, पालेभाज्या 20 रुपये जुडी, तर कोथिंबिरीच्या तीन जुड्या 50 रुपयांना मिळत आहेत. लिंबू 50 रुपयांना सुमारे 15 नग या दराने मिळत असून, आले 120 रुपये, छोटा लसूण 160 रुपये आणि मोठा लसूण तब्बल 360 रुपये किलोपर्यंत विकला जात आहे. दरवाढीचे मुख्य कारण म्हणजे हवामानातील अनिश्चितता, तसेच काही भागात पिकांचे नुकसान हे असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येते. हिवाळ्याच्या तोंडावर बाजारपेठेत मागणी वाढत असल्याने आगामी काळात दरात आणखी चढउतार होण्याची शक्मयता व्यक्त केली जात आहे.









