मंडणगड :
जुलै महिन्यातील पावसामुळे तालुक्यातील कडी-कपाऱ्यात सक्रिय झालेले धबधबे पर्यटकांसह स्थानिकांनाही खुणावत आहे. केळवत, तुळशी, पालवणी, चिंचाळी, उमरोली घोसाळे घाटात रस्त्यांशेजारी सक्रीय झालेले अनेक लहान-मोठे धबधबे पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
जुलै महिन्यात पहिल्या वीस दिवसात पावसाने दरवर्षीच्या सरासरीच्या पुढे झेप घेतली आहे. पावसाची रिपरिप सुरू असल्याने पावसात भिजण्याचा आनंद पर्यटकांसह स्थानिकही लुटत आहेत. चिंचाळी, कोकणमळा पारकुंड, वेसवी येथील धबधब्यांवर पर्यटकांची विशेष गर्दी दिसून येत आहे. याचबरोबर चिंचाळी, पंदेरी, भोळवली, तुळशी धरण परिसर पर्यटकांचे आर्कषण वाढवत आहे.
- नियोजनाची आवश्यकता
पावसाळ्याच्या दिवसात तालुक्यातील धबधबे प्रवाहित होत असल्याने पर्यटक याचा आस्वाद कसा घेतील व यातून तालुक्यात रोजगार निर्मिती कशी होईल या माध्यमातून पावसाळी पर्यटन वृद्धीसाठी वेगळ्या नियोजनाची आवश्यकता आहे. पर्यटकांना अधिकाधिक सुविधा निर्माण कशा होतील, यावर भर देण्याची आवश्यकता आहे. याचबरोबर धबधब्याचे पर्यटकांच्या ठिकाणी जाणाऱ्या सुरक्षिततेच्यादृष्टीनेही खबरदारीच्या उपाययोजना करणे गरेजेचे बनले आहे.








