ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राज्यात हिंदू-मुस्लिम दंगल घडविण्याचा कट रचण्यात आला होता. तो कट मला उधळून लावायचा होता. मी औरंगजेबाच्या कबरीवर फुलं चढवली अन् औरंगजेबाच्या नावाने होणारी दंगल रोखण्यात मला यश आलं. मात्र, माझ्या या कृत्याचा चुकीचा समज तयार केला जात आहे, असे स्पष्टीकरण वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी दिले.
प्रकाश आंबेडकर यांनी खुल्ताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन फुलं वाहिल्याने त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. त्यावर आंबेडकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले, औरंगजेबाने 54 वर्ष राजा म्हणून राज्य केलं. त्याने सुफी परंपरा जपली. औरंगजेबाला चांगल्या-वाईट बाजू आहेत. चांगल्या बाजूचं गुणगाण गायलं पाहिजे, वाईट बाजू सोडल्या पाहिजेत. मी औरंगजेबाच्या कबरीवर फुलं चढवली. त्याचा चुकीचा समज तयार केला जात आहे. राज्यात हिंदू-मुस्लिम दंगली करण्याचा जो बेत होता, तो मला थांबवायचा होता. माझ्या त्या प्रयत्नाला यश आलं असं मी म्हणतो. औरंगजेबाच्या नावाने जी दंगल होणार होती ती थांबली आहे. यापूर्वी बरेच राजकीय नेते औरंगजेबाच्या कबरीवर गेले आहेत, असाही उल्लेख त्यांनी यावेळी केला.








