लाखो रुपयांचा निधी वाया : पुन्हा रोपटी लावण्याची मागणी
बेळगाव : शहरातील विविध रस्त्यांचे सौंदर्य वाढविण्यासह हिरवाईत वाढ करण्याच्या उद्देशाने स्मार्ट सिटी योजनेंतर्गत रस्त्यांच्या कडेला ठेवण्यात आलेल्या कुंड्यांमधील रोपट्यांना पाणी व निगा करण्यासाठी कोणीही नाही. त्यामुळे बहुतांश ठिकाणच्या कुंड्यांची दुरवस्था झाली असून त्यामध्ये रोपटीही सुकून गेली आहेत. स्थानिक आणि व्यापाऱ्यांच्या काळजीमुळे काही कुंड्यांची देखभाल केली जात असल्याने काही ठिकाणच्या रोपट्यांची व्यवस्थित वाढ झाली आहे. बहुतांश कुंड्यांची देखभाल नसल्याने दुरवस्था होण्यासह रोपटी सुकून गेल्याचे दिसून येत आहे. या कुंड्यांचा वापर आता कचरा, दारूच्या बाटल्या फेकण्यासह जाहिरात फलक लावण्यासाठी केला जात आहे.
2021 मध्ये स्मार्ट सिटी योजनेतून नेहरूनगर, शिवबसवनगर, श्रीनगर, वंटमुरी कॉलनी आणि अंजनेयनगर या ठिकाणच्या रस्त्यांवर फुलांच्या कुंड्या लावण्यात आल्या होत्या. 4119 प्रमाणे प्रति कुंड्या खरेदी करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये माती भरण्यासाठी प्रत्येकी 1550, खतासाठी 500 रु., कंपोस्टसाठी 15 रु. त्याचबरोबर प्रति रोपट्यासाठी 275 रु. खर्च करण्यात आला आहे. काही दिवसांपासून चांगल्या प्रकारे देखभाल करण्यात आलेल्या कुंड्यांकडे मात्र आता दुर्लक्ष झाले आहे.
स्मार्ट सिटीने जानेवारी 2025 मध्ये सदर कुंड्या व रोपटी महापालिकेकडे हस्तांतरित केली आहेत. मात्र, महापालिकेकडून अद्यापही त्यांची देखभाल केली जात नाही. काही कुंड्या फुटल्या आहेत. तसेच त्यांच्यावरील रंगही उडाला आहे. काही कुंड्या गटारीमध्ये पडल्या आहेत. कचऱ्याने भरलेल्या कुंड्यांमध्ये लावलेली रोपटी उगवली नाहीत. दरवर्षी जेव्हा विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुवर्ण विधानसौधमध्ये होते, त्यावेळी कुंड्यांमध्ये रोपटी लावली जातात व त्यांची काही दिवस देखभाल केली जाते. अधिवेशन संपल्यानंतर पुन्हा तीच परिस्थिती निर्माण होत आहे.
सुरुवातीला कुंड्यांची निगा व्यवस्थित होत होती. त्यामध्ये खजुरांची झाडे आणि चार प्रकारच्या फुलांची झाडे लावण्यात आली होती. स्थानिक नागरिकांनीदेखील कुंड्यांमधील रोपट्यांच्या देखभालीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मात्र, बहुतांश ठिकाणी कुंड्यांमध्ये कचरा टाकला जात आहे. तसेच मोकाट जनावरांकडून रोपटी खाल्ली जात आहेत. इतकेच नव्हे तर फिरावयास आलेल्या काही जणांकडून कुंड्यांमधील रोपटी चोरून नेली जात आहेत. त्यामुळे लाखो रुपये खर्चून राबविण्यात आलेला हा प्रकल्प ‘असून अडचण नसून खोळंबा’ बनलेला आहे.
शिक्षण संस्थांचा पुढाकार
शहरातील काही शैक्षणिक संस्थांकडून आपल्या कॅम्पस आवारातील दुभाजकांच्या देखभालीची जबाबदारी घेण्यात आली आहे. दुभाजकांवर आकर्षक फुलांची झाडे लावण्यासह रंगरंगोटी करण्यात आली आहे. त्यामुळे काही ठिकाणच्या रस्त्यांवर तसेच दुभाजकांवर लावण्यात आलेल्या झाडांची देखभाल खासगी शिक्षण संस्थांकडून केली जात आहे. महानगरपालिकेकडे दुभाजक व परिसराची देखभाल करण्याची जबाबदारी आपल्याला देण्यात यावी, अशा मागणीचे प्रस्ताव मोठ्या प्रमाणात येत आहेत.









