फूल बाजारात 80-85 टन फुलांची आवक : झेंडूला सर्वाधिक मागणी : दसऱ्यानंतर पुन्हा फुलांच्या मागणीत वाढ
बेळगाव : दिवाळीनिमित्त अशोकनगर येथे होलसेल फूल बाजारात झेंडू तसेच इतर फुलांची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. सर्वाधिक मागणी केशरी व पिवळ्या झेंडूच्या फुलांना होती. तब्बल 80 ते 85 टन फुलांची आवक झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. यामुळे लाखो रुपयांची उलाढाल फुलांच्या बाजारात झाल्याने खरेदीदार व विक्रेत्यांनाही चांगले उत्पन्न मिळाले आहे. दसऱ्यानंतर 15 दिवसांनी पुन्हा एकदा फुलांची मागणी वाढली आहे. मंगळवारी लक्ष्मीपूजन तर बुधवारी दिवाळी पाडवा असल्याने फुलांच्या मागणीत दुप्पटीने वाढ झाली आहे. शहरात पाहाल तिकडे फुलांनी बहरलेली बाजारपेठ दिसून येत आहे.
बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी, बैलहोंगल, सौंदत्ती यासह राज्यातील विविध भागांतून मोठ्या प्रमाणात फुलांची आवक झाली आहे. लक्ष्मीपूजन व इतर पुजेसाठी केशरी व पिवळ्या झेंडूसह पिवळी व पांढरी शेवंती, लहान गुलाब, मोगरा व अबोली यांच्या माळा विक्री केल्या जात होत्या. झेंडू 40 रुपयांपासून 60 रुपयांपर्यंत प्रतिकिलो दराने विक्री केले जात होते. शेवंती 100 रुपयांपासून 150 रुपयांपर्यंत विक्री होत होती. होलसेल बाजारासह बेळगाव किरकोळ बाजारातही फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी होती. गणपत गल्ली, मारुती गल्ली, समादेवी गल्ली, किर्लोस्कर रोड, खडेबाजार या परिसरात ठिकठिकाणी झेंडूच्या फुलांची तसेच फुलांच्या माळांची विक्री करणाऱ्या महिला दिसून आल्या.









