शिराळा / प्रितम निकम :
जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट असलेले सह्याद्री व्याघ्र राखीव मधील चांदोली राष्ट्रीय उद्यान येथील उदगिरी पठार फुलांनी बहरण्यास सुरुवात झाली आहे. सद्यस्थितीत हलका पाऊस, दाट धुके, थंडी असे वातावरण आहे. पावसाळी आणि अल्हाददायक वातावरणात रान फुले उत्सवाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची पावले चांदोलीकडे वळू लागली आहेत.

नैसर्गिक जागतिक वारसा स्थळ, इम्पॉर्टंट बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट, इम्पॉर्टंट बर्ड एरिया, इम्पॉर्टंट टायगर एरिया असलेल्या सह्याद्रीच्या उदगिरी पठारावर विविध रंगांची रान फुले उमलण्यास प्रारंभ झाला आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर या कालावधीत पर्यटकांना रान फुलांचे 15 पेक्षा जास्त प्रकार पहायला मिळतात. यामध्ये टोपली कार्वी, सीतेचे आसवे, रान हळद, सीरोपेजिया, मिकी माऊस फ्लावर, धनगरी फेटा, जांभळी मंजिरी, निळी भारंगी, तेरडा, तुतारी, हळदी कुंकू, टूथब्रश ऑर्किड, गुढी ऑर्किड इत्यादी अनेक प्रकारची रान फुले पर्यटकांना गाईड सोबत घेऊन पाहण्यास उपलब्ध आहेत.

चांदोलीतील उदगिरी पठार हे कास पठारच्या तुलनेत पर्यटकांसाठी विना गर्दीचे, सुटसुटीत आहे. शालेय आणि कॉलेज विद्यार्थ्यांना या पठारावर दुर्मिळ फुलं अभ्यासण्याची संधी उपलब्ध आहे. पठारावर रानफुलांचा अभ्यास करण्यासाठी ऑनलाईन बुकिंगची सुविधा चांदोलीचे नॅचरलिस्ट प्रणव महाजन यांनी उपलब्ध केली आहे. प्रणव महाजन यांना संपर्क करून फुलांची माहिती, नेचर ट्रेल, बायोडायव्हर्सिटी वॉक, वॉशरूम आणि भोजन व निवासाची व्यवस्था पर्यटक करू शकतात. याचबरोबर चांदोली बर्डविंग इको टूरिझमच्यावतीने मुख्य रस्त्यावरून रानफुलांच्या सफारीसाठी ओपन पर्यटक वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे








