लहानपणी एक जाहिरात कायम ऐकायची ‘एक बूंद जिंदगी की’. जाहिरात खरं म्हणजे खूप काही प्रेरणादायी असं सांगून जायची. कित्येकांचे आयुष्य बदलून जायचे आणि मग मनात यायचे, की असे कितीतरी थेंब आपल्या मनावर आपल्या शरीरावर आणि आपल्या आयुष्यावरच परिणामकारक ठरतात. बऱयाचदा घरामध्ये दुधामध्ये आंबट थेंब पडला की सगळंच दूध नासायचं आणि आईचा आरडाओरडा सुरू व्हायचा. तिचा त्रागा व्हायचा दूध वाया गेलं म्हणून. परंतु दुसऱया क्षणाला या नासलेल्या दुधाचे विविध पदार्थ बनताना दिसायचे आणि आम्हा सगळय़ांना आनंद व्हायचा पण तरीही आईची बडबड सुरूच. कारण मानवी वृत्तीच दूध नासलं म्हणून जास्त दुःख करणारी अशी ठरते. आम्ही यातच सगळेजण अडकून पडतो आणि अशा घडलेल्या दुःखाच्या क्षणांचे दोष स्वतःकडे घेत जातो किंवा त्या एका थेंबालाच वाईटपणा देऊन मोकळे होतो. मधाचा थेंब मात्र दह्या दुधात पडला की त्याचं पंचामृत होतं. पूजेमध्ये सन्मानाने मिरवलं जातं, आणि सगळय़ांना तीर्थाचा आनंद मिळतो.
धुक्मयाचे पांढरे शुभ्र मलमली पडदे निळय़ा आकाशातून खाली यायला लागले की दवबिंदू नक्की येणार याची खात्री माणसाला पटते. आणि मग निसर्गाच्या सानिध्यात प्रत्येक पानावरती, फांदीवरती दवबिंदू आपले मोत्यांचे सर अलगद सोडून द्यायला सुरुवात करतात. हिरव्या पानांवरचे हे पांढरे शुभ्र मोती पानाफुलांना मोत्यांच्या अलंकारांनी जणू सजवत असतात. शेतातल्या पिकांना मात्र या दवबिंदूमुळे चांगलीच बळकटी येते. शेतकऱयांचे आणि हवामानाचे अंदाज बांधायला या दवबिंदूचीच मदत होते. थंडीला निमंत्रण या दवबिंदूंमुळेच मिळतं. दवबिंदू प्रत्येक फांदीला सुंदर पैंजण बांधत असतात आणि आजूबाजूच्या परिसराला फुलांना, पक्षांना जागं करत असतात. इकडे समुद्रात मात्र आश्लेषा नक्षत्राची वाट बघत अनेक शिंपले आपले दोन्ही बाहू पसरून त्या थेंबांची वाट पाहत असतात. अनेक वर्ष त्यांना असं ति÷त उभं राहायला लागतं आणि कधीतरीच हे भाग्य एखाद्याच्या वाटय़ाला येतं आणि त्यांचं सगळं जगणं सार्थकी लागतं. त्यात त्या शिंपल्याचं अस्तित्व संपतं पण तो शिंपला अभिमानाने हे सगळं स्वीकारतो आणि तुम्हा आम्हाला एक सुंदर निस्वार्थ जगण्याचा संदेश देऊन जातो. ‘थेंबे थेंबे तळे साचे’ कोणत्याही चांगल्या गोष्टीची साठवण करायला थेंबांचे योगदान लागतेच मग ते पाण्याचे तळे असो किंवा पैशाचा मॅजिक बॉक्स. आम्हाला त्या थेंबांकडे कसं बघायचं, ते कसे साठवायचे आणि त्यावरून पुढचा काळ कसा घालवायचा हे सगळं ठरत असतं. काटकसरीमुळे साठवलेले थेंब आम्हाला जगण्यासाठी लायक बनवत असतात. आमच्या मनाला शरीराला शिस्त लावत असतात. आमच्या उधळपट्टीला लगाम घालत असतात किंवा स्वतःलाच प्रश्न विचारायला आम्हाला उद्युक्त करत असतात. मला इतक्मया साऱया वस्तू जमवायची गरज आहे का? माझ्या आवश्यकतेनुसार सगळं काही आहे मग हा हव्याच कशाला? नाही का.








