लांजा :
शहरातील श्रीराम पूल येथे मंगळवारी वहाळाला आलेल्या पुराचे पाणी थेट येथील नागरिकांच्या घरात शिरले. त्यामुळे महामार्ग ठेकेदार कंपनीच्या संथपणे सुरू असलेल्या कामांचा व ढीसाळ नियोजनाचा जोरदार फटका लांजातील नागरिकांसह वाहनचालकांना बसला.
पावसाला सुरुवात झाल्यानंतर नागरिक व वाहनचालकांची महामार्गाच्या अर्थवट कामामुळे बिकट परिस्थिती झाली आहे. शहरातील श्रीराम पुलाचे काम मे महिन्यात हाती घेण्यात आले होते. सुरुवातीपासूनच हे काम धिम्यागतीने सुरू झाले. वास्तविक पाहता हे काम पावसाळ्यापूर्वीच पूर्ण करणे गरजेचे होते. कारण मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांसाठी लांजातील हा एकमेव व महत्वाचा पूल आहे. परंतु याचे काम धिम्यागतीने व उशिरा सुरू केले गेल्याने याचा फटका सध्या नागरिकांना बसत आहे. पुलाचे काम सुरू असल्याने एका बाजूने वाहतुकीसाठी तयार केलेल्या रस्त्याच्या ठिकाणी वहाळाचे पाणी वाहून जाण्यासाठी एकच मोरी टाकण्यात आली होती. त्यामुळे या वहाळाला आलेल्या पुराचे पाणी जाण्यासाठी एक मोरी अपुरी पडत असल्याने पुराचे पाणी आजूबाजूला असणाऱ्या घरांमध्ये शिरत असून वहाळ तुंबल्याचा फटका त्यांना गेले अनेक दिवस सहन करावा लागत आहे. या बाबत वेळोवेळी संबंधित नागरिकांकडून कळविण्यात आले. परंतु त्याकडे दुर्लक्ष झाल्याने त्याचे परिणाम दिसले. यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात आला.
संततधार पावसामुळे मंगळवारी पहाटेपासूनच श्रीराम पूल येथे पाणी तुंबायला सुरुवात झाली होती. त्यानंतर सकाळी ७ वा. पाण्याचा प्रवाह वाढत जाऊन पुलाजवळ असलेल्या घरांमध्ये पाणी शिरायला सुरुवात झाली. घरात पाणी शिरल्याने संबंधितांची वाताहत झाली. यानंतर नगर पंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी वहाळ साफ करण्यास सुरुवात केली. श्रीराम पुलाच्या एका लेनचे काम शेवटच्या टप्प्यात असल्याने दुसऱ्या बाजूने रस्त्यावरून एक लेन सुरू होती. त्यामुळे वाहतूककोंडीची समस्या सुरूच होती. अशातच पाऊस पडल्याने महामार्ग पाण्याखाली येऊन वाहतूक बंद होण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. अखेर मंगळवारी सतत पडणाऱ्या पावसाने अर्धवट कामाचे परिणाम पहावयास मिळाले.
पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने व संतप्त नागरिकांनी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरल्याने त्यांची धावपळ उडाली. तात्काळ त्यांनी नवीन पुलावरून वाहतूक सुरू करण्यासाठी हालचाली सुरू केल्या व मशिनरी लावून कामाला सुरुवात केली. सायं. ६ च्या सुमारास काम पूर्ण झाल्यानंतर पुलाची एक लेन सुरू करून वाहतूक सोडण्यात आली.
- लांजा पोलिसांची दमछाक
संततधार पाऊस, पुलाचे अर्धवट काम, पुलाच्या वहाळात पाणी तुंबल्याने वाहतुकीस झालेला अडथळा व मंगळवारच्या आठवडा बाजारामुळे वाहतूक कोंडी होऊन दुपारच्या सुमारास लांजा बाजारपेठेत कोर्ले फाटा ते रेस्ट हाऊसपर्यंत २ किलोमीटर इतक्या लांब वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहनांना वाट मोकळी करून देताना लांजा पोलिसांची दमछाक झाली. सायंकाळपर्यंत वाहनांची लाईन हळूहळू पुढे सरकत होती.
- .. अखेर श्रीराम पूल वाहतुकीसाठी खुला
शहरातील रखडलेले श्रीराम पुलाचे काम महामार्ग ठेकेदार कंपनीने युद्धपातळीवर हाती घेत हा पूल वाहतुकीसाठी खुला केला. अखेर मंगळवारी सायंकाळी ६ वाजता हा पूल वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला.








