निम्म्याहून अधिक देश अतिवृष्टीच्या प्रभावाखाली
वृत्तसंस्था / काठमांडू
भारताच्या उत्तरेला असणाऱ्या नेपाळ देशात सध्या अतिवृष्टीचे आणि महापुराचे थैमान होत आहे. या देशाच्या पूर्व भागाला महापुराचा सर्वात मोठा तडाखा बसला असून गेल्या 24 तासांमध्ये भूस्खलन आणि अतिवृष्टीमुळे 51 जणांचा बळी गेला आहे. आपत्कालीन सहाय्यता कार्य करण्यात येत असून भारतानेही या देशाला साहाय्याचा हात पुढे केला आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून हा देश अतिवृष्टीचा मार सहन करत आहे. असंख्य लोक बेघर असून साहाय्यता केंद्रांमध्ये त्यांना आसरा देण्यात आला आहे. तेथेही अन्नपाण्याचा तुटवडा जाणवत आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळला साहाय्यता देण्याची सज्जता केली आहे. नेपाळ हे आमचे सीमावर्ती आणि शेजारचे राष्ट्र आहे. या देशाला त्याच्या संकटकाळात साहाय्यता करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. नेपाळने मागणी केल्यास आणखी साहाय्यता सामग्री दिली जाईल. नेपाळ हा भारताचा मित्रदेश असल्याने त्याला साहाय्य करणे हे आमचे कर्तव्य आहे. आम्ही देश पूर्ण सामर्थ्यानिशी पार पाडू, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविचारी सकाळी दिले.
तीन्ही सेनादले कार्यरत
नेपाळच्या तीन्ही सेनादलांनी बचाव आणि साहाय्यता कार्याला प्रारंभ केला आहे. स्थानिक बचाव यंत्रणेच्या हाताबाहेर ही परिस्थिती गेल्याची जाणीव झाल्यानंतर तीन्ही सेनादलांना पाचारण करण्यात आले. त्यामुळे नेपाळच्या वायुदलानेही आता बचावकार्यात पुढाकार घेतला आहे. दुर्गम भागांमध्ये अन्नपाणी औषधे आणि इतर जीवनावश्यक सामग्री पोहचविण्यास प्रारंभ करण्यात आला. रविवारी नेपाळच्या वायुदलाने महापुरात अडकलेल्यांची सुटका करण्यासाठी हेलिकॉप्टर्स नियुक्त केली आहेत. आतापर्यंत किमान 1 हजार जणांचा जीव वाचविण्यात यश आले आहे.
सहा प्रमुख नद्यांना पूर
नेपाळमधील सहा प्रमुख नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे त्यांच्या तटांनजीक राहणाऱ्या लोकांना सुरक्षित स्थळी जाण्याची सूचना करण्यात आली. नेपाळच्या डोंगरमाथ्यांवर मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने नद्यांना पूर आला आहे. गेले पंधरा दिवस सातत्याने हा पाऊस होत आहे. भारताप्रमाणे यंदा नेपाळमध्येही सरासरीपेक्षा अधिक पाऊस आतापर्यंत झाला आहे, अशी माहिती देण्यात आली. नेपाळचा निम्म्याहून अधिक भाग महापूर आणि अतिवृष्टीच्या प्रभावाखाली असून किमान 20 लाख लोक या नैसर्गिक आपत्तीच्या प्रभावाखाली आले आहेत. या अतिवृष्टीमुळे भारतातील, विशेषत: बिहार आणि उत्तर प्रदेशातील नद्यांनाही पूर आला असून भारतातही नागरीकांना सुरक्षित स्थळी जाण्याची सूचना आहे.








