वृत्तसंस्था / इस्लामाबाद
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात अतिवृष्टी आणि महापुराचा हाहाकार झाला असून 300 हून अधिक जणांचा बळी गेला आहे. या प्रांतातून वाहणाऱ्या चार नद्या आणि मुख्य असणारी सिंधू नदी यांना पूर आलेला आहे. या पुरात नद्यांच्या तटावरील घरे आणि निवासस्थाने वाहून गेली आहेत. या देशाचे माजी नेते नवाझ शरीफ यांचे घरही वाहून गेल्याची माहिती देण्यात आली आहे. शेतांमधून पाणी शिरल्याने पिकांचे कोंब कुजण्याचा धोका निर्माण झाला आहे. भारतातून पाकिस्तानात वाहणाऱ्या नद्यांमध्येही पाण्याची पातळी वाढली आहे. भारताने या नद्यांवरील धरणांचे दरवाजे उघडल्याने पाकिस्तानातील पूरपरिस्थिती आणखी बिघडली आहे, असा पाकिस्तानचा आरोप आहे. येत्या काही दिवसांमध्ये पूर कमी झाला नाही, तर हानी नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.









