सांगली :
सांगली शहराला भेडसावणाऱ्या पाण्याबाबत महापूराच्या कायमस्वरूपी तोडगा व उपाययोजना महानगरपालिका करणार आहे. यासाठी जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातून राबविण्यात येणाऱ्या ६०० कोटीच्या कामाची निविदा महापालिकेकडून प्रसिध्द करण्यात आली आहे. मनपा क्षेत्रातील विशेषतः सांगली शहरामध्ये आलेल्या महापुराच्या पाण्याबाबत उपाययोजना करण्यासाठी चार महिन्यापुर्वी जागतिक बँकेच्या पथकाकडून सांगली शहराची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली होती. या पथकाकडून सांगलीसह कोल्हापूर शहराचीही पाहणी करण्यात आली होती.
चारवेळच्या महापुराने सांगली शहराची मोठी हानी झालेली आहे. नागरी वस्त्या आणि बाजारपेठांना महापुराचा फटका बसून कोट्यवधीचे नुकसान झाले. या सर्व बाबींचा विचार करून राज्य शासनामार्फत जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातून महापुराच्या पाण्याबाबत कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्यासाठी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून मनपाकडून ६०० कोटीच्या कामाची निविदा प्रसिध्द करण्यात आली आहे. हे काम आगामी तीन वर्षात पुर्ण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. महापुराचा फटका बसलेल्या शामरावनगर भागातील नाले अंकलीच्या दिशेला कृष्णा नदीला जोडण्याचा प्रस्ताव आहे.








