बळ्ळारी नाल्याला पूर आल्याने परिसरातील शेती पाण्याखाली : शिवार बनले जलमय, पावसाचा जोर वाढण्याची शक्यता
वार्ताहर /सांबरा
तालुक्याच्या पूर्वभागांमध्ये रविवारी जोरदार पावसाने हजेरी लावल्याने बळळारी नाल्यासह इतर सर्व नाल्यांना यावर्षी पहिल्यांदाच पूर आला आहे.त्यामुळे परिसरातील हजारो एकर भातशेती पाण्याखाली गेली आहे. गेल्या काही दिवसापासून पूर्व भागातील बसवन कुडची, निलजी, मुतगे, शिंदोळी, बसरीकट्टी, सांबरा, बाळेकुंद्री खुर्द, पंत बाळेकुंद्री, होनिहाळ, मोदगा, सुळेभावी आदी भागांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे सखल भागासह शिवारामध्ये पाणी साचण्यास प्रारंभ झाला होता. अशातच रविवारी पावसाचा जोर वाढल्याने बळळारी नाल्यासह सांबरा, बाळेकुंद्री खुर्द व मोदगा येथुन गेलेल्या नाल्यांनाही पूर आला आहे. त्यामुळे सर्व शिवार जलमय झाले आहे.
भाजीपाल्याचे नुकसान
यावर्षी पूर्वभागामध्ये जून महिना संपून जुलै महिना आला तरी पावसाने हजेरी लावली नव्हती. त्यामुळे भातपेरणी केलेल्या अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. पाऊस लांबल्याने अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाला पिके घेतली होती. मात्र सध्या सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कोथिंबीर, मेथी, शेपूसह इतर भाजीपाला पिकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे.
आठवडी बाजारावर परिणाम
येथील आठवडी बाजारावर परिणाम मुतगे येथे दर रविवारी आठवडी बाजार भरतो. मात्र रविवारच्या पावसामुळे बाजारावर परिणाम दिसून आला. नागरिकांनी संततधार पावसामुळे बाजाराकडे पाठ फिरवली तर बाजारपेठेमध्ये पाणी साचल्याने विक्रेत्यांचीही गैरसोय झाली.
नाल्याच्या पात्रात अतिक्रमण
सांबरा व मुतगा गावच्या परिसरातून गेलेल्या नाल्याला यंदा प्रथमच पूर आला आहे. जोरदार पावसामुळे व अतिक्रमणामुळे नाल्याच्या पात्रातील पाणी बाहेर पडून परिसरातील शेती पाण्याखाली गेली आहे. सदर नाल्याच्या पात्रामध्ये काही शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे नाल्याचे पात्र अरुंद झाले असून नाल्याला पूर आला आहे. संबंधित अधिकारी या प्रकाराकडे लक्ष देतील काय, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.









