वारणानगर, प्रतिनिधी
पाऊसाने आलेल्या पुरामुळे वारणा नदीवर असणाऱ्या कोल्हापूर पद्धतीच्या सर्वच बंधाऱ्याला विविध प्रकारची झाडे, झुडपे,कचरा अडकल्याने पाण्याच्या प्रवाहात अडथळा ठरू लागली आहेत. पाटबंधारे विभागाने तात्काळ याकडे लक्ष द्यावे अशी मागणी नागरीकांतून होत आहे.
वसंत सागर या चांदोली धरणातून वारणा नदीला बारमाही पाणी पुरवठा होत असतो. नदीवर असणाऱ्या सर्वच बधाऱ्यांना प्रत्येक वर्षी पावसाळ्यात येणाऱ्या पुरामुळे प्रवाहा बरोबर आलेली झाडे, लाकडी ओंडके व इतर कचरा वाहत येऊन अडकतो.त्यामुळे बंधाऱ्यामधून पाण्याचा विसर्ग होण्यात अडथळा होतो. त्यामुळे बंधाऱ्यावर पाणी साठ्याचा दबाव निर्माण होऊन धोका होण्याची शक्यता आसते.
गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून परिसरात पावसाला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली.त्यामुळे ओढे,नाले,नदी दुथडी भरून वाहत आहेत.चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाथरपुंज या वारणा नदीच्या उगमा पर्यंत १२६७ मि.मी. पर्यंत पाऊस पडला आहे. पावसाचे प्रमाण जास्त असल्याने पाण्याची आवक ८०८५ क्यूसेस आहे. धरण ८५ टक्के भरले आहे.विद्युत निर्मीतीसाठी ८०६ तर वक्रद्वार मधून ७२७९ एकूण जेवढी पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक आहे. तेवढाच ८०८५ क्यूसेस नदी पात्रात विसर्ग सुरु आहे. सद्या पाऊसाचा जोर ओसरल्याने पाणी पात्राच्या आत आले आहे. पाण्याखाली गेलेले बंधारे काही फुटाने उघडे झाल्याने बधाऱ्याला अडकलेली झाडे झुडपे कचरा दिसू लागली आहेत.









