वार्ताहर /दाभाळ
उण्णय व दूधसागर नदीची पातळी वाढल्याने गेल्या दोन दिवसांपासून पाण्याखाली गेलेले पेण्यामळ निरंकाल व दावकोण येथील रस्त्यांवरील पाणी ओसरले आहे. त्यामुळे सोमवारपासून पुन्हा या रस्त्यांवऊन वाहतुकीचा मार्ग खुला झाले आहे. शनिवार व रविवार असे दोन दिवस या दोन्ही भागातील रस्ते पाण्याखाली गेले होते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. निरंकाल दाभाळ गावांमधून वाहणाऱ्या उण्णय नदीला पूर आल्याने पेण्यामळ निरंकाल येथील मुख्य रस्ता दोन दिवस पाण्याखाली होता. त्यामुळे दोन्ही गावांचा संपर्क तुटल्याने दाभाळकडून निरंकालकडे ये – जा करणारी वाहतूक धारबांदोडामार्गे किंवा पाज, बिंबल, वागोण या पर्यायी मार्गावरून वळवावी लागली होती. दाभाळ पूल ओलांडून अवघे दोन मिनिटाचे अंतर पार करण्यासाठी वाहनचालकांना लांबचा वळसा घालणे भाग पडले होते. दोन दिवस रस्ता पाण्याखाली राहिल्याने विद्यार्थी व कामगारवर्ग घरीच अडकून पडला होता. सोमवारी सकाळपासून पाणी ओसरल्याने पुन्हा वाहतूक या रस्त्यावरून सुरु झाली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास रस्ता पुन्हा ही समस्या उद्भवण्याची भिती आहे.









