दिल्ली-गुजरात वाहतुकीवर परिणाम
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस सुरूच आहे. राज्यातील अनेक नद्या दुथडी भरून वाहत असल्यामुळे सिरोही जिह्यात दिल्ली-गुजरात राष्ट्रीय महामार्गावर पाणी भरले आहे. दुसरीकडे, गुजरातच्या उत्तरेकडील भागातही मुसळधार पाऊस पडत आहे. रविवारी सकाळी बनासकांठा जिह्यातील अमीरगडमध्ये दोन तासांत 101.6 मिमी पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. येथील स्थानिक कालेडी नदी दुथडी भरून वाहत असल्यामुळे आजूबाजूच्या गावांमधील रस्त्यांवर गुडघ्यापर्यंत पाणी साचले होते.
जोरदार पावसादरम्यान जोधपूरमध्ये पाण्यातून बाहेर येणारी एक कार नाल्यात पडली. पाण्यात बुडून तीन जणांचा मृत्यू झाला. शुक्रवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे मध्य प्रदेशातील चित्रकूट जिह्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. गुप्त गोदावरी टेकडीवर पाण्याचा वेगवान प्रवाह असल्याने भाविकांचा प्रवेश बंद करण्यात आला आहे. गुणा जिह्यातील फतेहगड येथे कोहान नदीत ट्रॅक्टर-ट्रॉली वाहून गेल्याने तीन तरुणांचा मृत्यू झाला.









