82 मृतदेह हाती : अजूनही 41 जण बेपत्ता
वृत्तसंस्था/ टेक्सास
अमेरिकेतील टेक्सास राज्य अजूनही पुराच्या विळख्यात आहे. अचानक आलेल्या भीषण पुरानंतर टेक्सासमध्ये किमान 82 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी सोमवारी देण्यात आली. अजूनही 41 जण बेपत्ता असून मृतांचा आकडा शंभरीपार पोहोचणार असल्याचे दिसून येत आहे. टेक्सासमधील बचाव पथके बेपत्ता लोकांना शोधण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहेत. केवळ टेक्सासमधील केर काउंटीमध्ये 28 मुलांसह 68 जणांचा मृत्यू झाला आहे. येथे आयोजित केलेला विद्यार्थिनींच्या कॅम्पमध्ये पुराचे पाणी घुसल्याने अनेकजण वाहून गेले आहेत. कॅम्पमधील दहा मुली आणि एक शिक्षक अजूनही बेपत्ता आहे. अचानक पूर आला तेव्हा या छावणीत सुमारे 750 लोक उपस्थित होते.
हवामान विभागाने मध्य टेक्सासमध्ये नवीन पूर इशारा जारी केला आहे. पुढील 24 ते 48 तासांत या भागात आणखी वादळ येण्याची शक्यता असल्यामुळे बचाव पथकांना अडचणी येऊ शकतात. चिखल आणि ढिगाऱ्यात बेपत्ता लोकांना शोधताना बचाव पथकांना विषारी सापांचा सामना करावा लागत आहे. टेक्सासच्या इतिहासातील हे सर्वात मोठे बचावकार्य असल्याचे मानले जाते. मध्य टेक्सासमध्ये बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी सुमारे 17 हेलिकॉप्टर तैनात करण्यात आली आहेत.









