नगरसेवक सुरेंद्र फुर्तादो यांची तक्रार : मनपाकडून उपाययोजनेनंतर स्थिती पूर्ववत
पणजी : राजधानीतील टोक भागात मलनिस्सारण प्रकल्पाच्या परिसरात बांधकाम सुरू असलेल्या मेगा प्रकल्पामुळे या भागात निर्माण झालेली पूरस्थिती सुधारण्यात मनपा कर्मचाऱ्यांना यश आले. एका कॅसिनो कंपनीकडून या दहा मजली अवाढव्य इमारतीचे बांधकाम सुरू आहे. मात्र सदर कंपनीने या भागाची भौगोलिक स्थिती तसेच पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पूरस्थितीचा अभ्यास न करताच प्रकल्प प्रारंभ केला. परिणामी बांधकामाधीन असलेल्या या इमारतीच्या परिसरात पहिल्याच पावसात पूरस्थिती निर्माण झाली. या प्रकरणी सर्वप्रथम नगरसेवक सुरेंद्र फुर्तादो यांनी आवाज उठवून सदर प्रकरण मनपाकडे पोहोचविले होते. सदर इमारत बांधताना सर्व कचरा आणि बांधकाम साहित्य बेजबाबदारपणे अस्ताव्यस्त टाकण्यात आल्यामुळे पावसाच्या पाण्याच्या वाटा अडविल्या जाऊन योग्य प्रकारे निचरा होत नव्हता. त्यामुळे मलनिस्सारण प्रकल्पाच्या परिसरात सर्वत्र पाणी भरून पूरसदृष्य स्थिती निर्माण झाली होती. फुर्तादो यांच्या या तक्रारीनंतर काल शुक्रवारी सायंकाळी महापौर रोहित मोन्सेरात यांच्यासह उपमहापौर संजीव नाईक, अभियंता विवेक पार्सेकर आणि अन्य अधिकाऱ्यांनी त्या भागाची पाहणी केली. त्यावेळी आरोपात तथ्य आढळून आल्यानंतर त्वरित उपाययोजना हाती घेण्यात आली. साचलेल्या पाण्याच्या वाटा मोकळ्या केल्यानंतर सर्व पाण्याची निचरा करण्यात आला. त्यामुळे स्थानिकांनी समाधान व्यक्त केले आहे.









